नवी दिल्ली : संभाव्य आॅलिम्पिकपटूूंचा शोध घेणाऱ्या ‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’(टॉप) समितीतून स्टार नेमबाज अभिनव बिंद्रा बाहेर पडला आहे. रिओ आॅलिम्पिकसाठी वर्षभरापेक्षा कमी कालावधी असल्याने सरावावर शंभर टक्के लक्ष देण्यासाठी आपण या समितीला वेळ देऊ शकणार नसल्याचे कारण अभिनवने दिले.टॉप समिती खेळाडूंची निवड करते आणि आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवू शकणाऱ्या संभाव्य खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा आर्थिक भारदेखील उचलते. बिंद्रा याने टॉप समिती अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. या पत्रात आॅलिम्पिक सुवर्ण विजेता अभिनव म्हणतो,‘ रिओ आॅलिम्पिकच्या तयारीत व्यस्त असल्याने समितीच्या कामकाजात पूर्ण लक्ष देता येणार नाही. आॅलिम्पिकला दहा महिने शिल्लक असल्याने सरावावर शंभर टक्के भर देऊ इच्छितो. खेळाडूंसाठी योगदान देण्याच्या इराद्याने या समितीत सहभागी झालो होतो, पण ज्या कार्यात योगदान देता येत नाही त्या समितीत केवळ जागा अडविणे आपणाला पसंत नाही. मी आयुष्यात नेहमी उत्कृष्ट काम करण्यावर भर दिला. आपल्या कार्याप्रति समर्पित राहिलो. समितीच्या कामकाजात लक्ष घालण्यासाठी माझ्याकडे पुढील आॅगस्टअखेरपर्यंत वेळ नाही. त्यामुळे समितीचे सदस्य म्हणून कायम राहण्यात अर्थ नसल्याचे माझे मत आहे.’ सार्थ योगदान देणाऱ्या एखाद्या व्यक्तीला माझी जागा दिल्यास मला बरे वाटेल, असे सांगून बिंद्रा पुढे म्हणाला,‘हे पत्र माझा राजीनामा म्हणून स्वीकार करावे.’खा. अनुराग ठाकूर अध्यक्ष असलेल्या टॉप समितीची स्थापना गतवर्षी क्रीडा मंत्रालयाने केली होती. आॅलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता बाळगणाऱ्या खेळाडूंना विदेशात प्रशिक्षणासह त्यांच्या संपूर्ण गरजांचा खर्च सरकार करणार आहे.
‘टॉप’ समितीचा बिंद्राचा राजीनामा
By admin | Updated: October 29, 2015 22:28 IST