नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नव्या प्रमुखाची निवड येत्या २२ मे रोजी होणार आहे. याच दिवशी बोर्डाची विशेष आमसभा बोलविण्यात आली आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले आहे.मीडिया वृत्तानुसार २२ मे रोजी बीसीसीआयच्या नव्या प्रमुखाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. आमसभेत अध्यक्षाची निवड करणे हा हकमेव अजेंडा राहील अशी माहिती गोवा क्रिकेट संघटनेचे महासचिव विनोद फडके यांनी दिली.सात महिने प्रमुख राहिल्यानंतर मनोहर यांनी ११ मे रोजी पदाचा राजीनामा दिला होता. आता ते आयसीसीचे स्वतंत्र चेअरमन बनले आहेत. सूत्रांनी दिलेल्या संकेतानुसार सध्याचे सचिव अनुराग ठाकूर यांच्या गळ्यात बीसीसीआय प्रमुखपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावावर एकमत झाल्याचा दावा सूत्रांनी केला. याशिवाय आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला तसेच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के हे देखील रेसमध्ये आहेत. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयचा नवा ‘बॉस’ २२ मे रोजी ठरणार
By admin | Updated: May 14, 2016 21:37 IST