नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यांत बाराबती स्टेडियमवर प्रेक्षकांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर कमालीचे संतापले असून, त्यांनी कटक येथील बाराबती स्टेडियमवर आगामी दोन वर्षे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना भरवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. इतकेच काय तर ओडिशा क्रिकेट संघटनेला दिले जाणारे अनुदजानदेखील बंद करावे अशी संतापजनक भावनादेखील त्यांनी व्यक्त केली. सोमवारी झालेल्या दुसऱ्या टी-टष्ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे प्रक्षकांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी पाण्याच्या बाटल्या देखील मैदानावर टाकून गोंधळ केला. त्यामुळे तब्बल वीस मिनिटे खेळ थांबविण्यात आला होता. त्यानंतरही सामना सुरु झाल्यानंतर हुल्लडबाजी सुरुच राहिल्याने दुसऱ्यांदा खेळ थांबवावा लागला. मॅच रेफ्री ख्रिस ब्राडॅ यांना अतिरिक्त सुरक्षेची मागणी आयोजकांकडे करावी लागली. या सामन्यात भारताचा डाव ९२ धावांत संपुष्टात आला होता. तर दक्षिण आफ्रिकेने हा सामना ६ गडी राखून जिंकला. या प्रकारामुळे संतप्त झालेले गावस्कर म्हणाले, संघाचा खेळ खराब झाला असला तरी प्रेक्षकांनी असे वर्तन करण्याची काहीच गरज नव्हती. जेव्हा संघ चांगला खेळत असतो, तेव्हा प्रेक्षक आपल्याकडी वस्तू फेकत नाहीत. मग एखाद्यावेळेस खराब कामगिरी झाल्यास असे वर्तन करण्याची आवश्यकता नाही. खरेतर अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलिसांनी देखील क्रिकेट सामना न पाहता अशा घटनांना रोकण्यासाठी पावले उचलायला हवी होती. भारतीय खेळाडूंनी आता स्वत:वर असलेल्या प्रेमातून बाहेर पडले पाहीजे. त्यांनी आपला खेळ अधिक चांगला कसा होईल, या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर कर्णधार महेंद्रसिंह धोनीला अक्षर पटेल याच्यावर विश्वास नव्हता तर अमित मिश्राला गोलंदाजी द्यायला हवी होती. खरे तर पटेलला (तुलनेने) लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणले गेल्याची टिका देखील गावस्कर यांनी केली. (वृत्तसंस्था)ओसीए : ...हा तर बदनाम करण्याचा कट1) येथे सोमवारी झालेल्या भारत- द. आफ्रिका टी-२० सामन्याच्या वेळी झालेल्या प्रेक्षकांच्या गोंधळाला ओडिशा क्रिकेट संघटनेने(ओसीए) बाराबती स्टेडियमला बदनाम करण्याचा कट असल्याचे संबोधले आहे. भारताच्या खराब कामगिरीवर नाराज झालेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान नाराज झालेल्या प्रेक्षकांनी आपला राग व्यक्त करीत स्टेडियममध्ये पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. यामुळे खेळात दोनदा व्यत्यय आला. द. आफ्रिकेच्या डावात ११ व्या षटकांत पहिल्यांदा हा प्रकार घडल्याने २७ मिनिटे खेळ थांबला. पुन्हा दोन षटकांचा खेळ होत नाही तोच १३ व्या षटकांत ३० मिनिटे खेळ थांबला होता. 2) ओसीए सचिव बेहरा म्हणाले,‘ येथे फार गर्मी असल्याने आणि वारंवार पाणी पिण्यासाठी तीन मजले खाली उतरावे लागू नये यासाठी पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली होती. लोकांना आम्ही सुविधा दिल्या पण त्यांनी याचा चुकीचा उपयोग केला. यातून भविष्यात काय काळजी घ्यायची याचा बोध घेता येईल. भविष्यातील सामन्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केली जाईल. स्टेडियममध्ये उपस्थित एका गटाने वारंवार बाटल्या फेकल्या. यातून ओसीएला बदनाम करण्याचा कट उघड होतो. गेल्या ३० वर्षांत कटकमध्ये अशी घटना पहिल्यांदा घडली.अशा घटनांना जास्त गंभीरतेने घेऊ नये. प्रेक्षकांकडून पाण्याची बाटली फेकण्याचे प्रकार या पूर्वी देखील झाले आहेत. वाइजेग येथे खेळत असताना संघाने सामना जिंकल्यानंतरही अशा घटनेला सामोरे जावे लागत होते. एखाद्या व्यक्तीने सुरुवात केल्यानंतर मजा म्हणून अनेकदा प्रेक्षक असे वागतात. अनेकदा प्रक्षेक मजेसाठी असे कृत्य करतात. मात्र ही घटना सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे वाटत नाही. - महेंद्रसिंह धोनी, भारतीय कर्णधार जगभरात अशा प्रकारचे उपद्रवी प्रेक्षक दिसून येतात. त्यामुळे केवळ भारतीय उपखंडातच असे प्रकार दिसून येतात असे वाटत नाही. मात्र भारतीय उपखंडातील प्रेक्षक तुलनेने अधिक आपल्यास संघाबाबत भावूक असतात. त्यामुळेत त्यांच्यामध्ये उत्साह देखील अधिक असतो. म्हणूनच येथे कदाचित अशा घटना अधिक होत असतील. मात्र एक खेळाडू म्हणून अशा घटना होऊ नयेत असेच वाटते.- फाफ डू प्लेसिस, दक्षिण आफ्रिका, कर्णधार
बाराबतीवर बंदी घाला!
By admin | Updated: October 7, 2015 03:09 IST