वेलिंग्टन : एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमी खेळीच्या बळावर द. आफ्रिकेने तिसऱ्या वन-डेत न्यूझीलंडचा १५९ धावांनी पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी संपादन केली.डिव्हिलियर्सने ८५ धावा ठोकताच नंबर १ आफ्रिकेने ८ बाद २७१ धावा उभारल्या. या खेळीदरम्यान त्याने वन-डे क्रिकेटमधील २०५ व्या सामन्यात वेगवान ९ हजार धावा पूर्ण केल्या. याआधी भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याच्या नावावर हा विक्रम होता. गांगुलीने २२८ व्या सामन्यात हा विक्रम नोंदविला होता. न्यूझीलंडला आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ३२.२ षटकांत ११२ धावांत गुंडाळले. ड्वेन प्रिटोरियसने पाच धावांत ३, एडिले फेवुलकवायो याने १२ धावांत २, वेन पार्नेलने ३३ धावांत २ आणि कागिसो रबाडाने ३९ धावांत २ गडी बाद केले. त्याआधी द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. डिव्हिलियर्सशिवाय सलामीचा क्विंटन डीकॉक याने ६८ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पहिल्या तीन षटकांत त्यांचे सलामीवीर गारद झाले. थोड्याच वेळात ५८ धावांत सहा गडी बाद झाले. त्यानंतरही पडझड सुरूच राहिली. सर्वाधिक नाबाद ३४ धावा कोलिन डी ग्रॅण्डहोम याने केल्या. (वृत्तसंस्था)
ए. बी. डिव्हिलियर्सची वेगवान विक्रमी खेळी
By admin | Updated: February 26, 2017 04:04 IST