म्हाकवे : उत्तराखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत म्हाकवे ता.कागल येथील मल्ल विनायक सिद्धेश्वर पाटील याने ६७ किलो वजनगटात सुवर्ण पदक पटकावून गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. उपांत्य फेरीत खेळताना त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात तो खेळण्याबद्दल साशंक होता. मात्र, प्रचंड आक्रमक आणि जिद्दी खेळाडू म्हणून परिचित असणारा विनायक आठ टाके पडलेली जखम घेऊन अंतिम फेरीत गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरियाणाच्या मल्लांशी भिडला. त्याने विरोधी मल्लांना गुणांकनावर चितपट करून यशाला गवसणी घातली.नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बानगे येथील जय भवानी तालमीच्या सहा खेळाडूंनी यश संपादन केले, तर याच तालमीत तयार झालेल्या विनायकनेही सुवर्ण कामगिरी केल्याने परिसरात या मल्लांसह मार्गदर्शकांचे कौतुक होत आहे. सध्या तो सैन्य दलात कार्यरत असून, त्याला पुणे येथे सैन्यदलाचे वस्ताद दळवी, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, वस्ताद तुकाराम चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.
डोक्याला गंभीर दुखापत झाली, तरी कोल्हापूरच्या पठ्ठ्याने सुवर्ण कामगिरी केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 17:48 IST