राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आसामला पहिले सुवर्ण; पुरुष गटात कर्नाटक सुवर्णपदकाचा मानकरी  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 10:09 PM2023-10-21T22:09:52+5:302023-10-21T22:14:35+5:30

पुरुष विभागात कनार्टकने महाराष्ट्राचा ३-१ ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. 

Assam's first gold in National Games; Karnataka gold medalist in men's category | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आसामला पहिले सुवर्ण; पुरुष गटात कर्नाटक सुवर्णपदकाचा मानकरी  

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आसामला पहिले सुवर्ण; पुरुष गटात कर्नाटक सुवर्णपदकाचा मानकरी  

पणजी : येथे सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक आसामने आपल्या नावे केले. महिलांच्या सांघिक बॅडमिंटनमध्ये आसामने महाराष्ट्राचा ३-० असा पराभव केला. शनिवारी (दि.२१) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम लढतीत आसामने पूर्ण वर्चस्व राखले.

आसामच्या अस्मिता चलिहा व ईशाराणी बरुआ यांनी आपापल्या एकेरीच्या लढतीत जबरदस्त खेळ करत विजय मिळवला. या दोघांनी यानंतर दुहेरीत एकत्र खेळताना राष्ट्रीय विजेत्या रितिका ठाकर व सिमरन सिंधी यांचा पराभव करत आसामला सुवर्ण पदक जिंकून दिले. भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पथकातील अश्मिताने आसामला आघाडीवर नेताना पूर्वा बर्वे हिचा २१-१६, २१-११ असा सरळ गेममध्ये पराभव केला. 

पहिल्या तीन पैकी किमान एका सामन्यात जरी विजय मिळविला तरीसुद्धा सुवर्ण पदकाची संधी असेल, अशी अपेक्षा महाराष्ट्राला होती. दुसऱ्या एकेरीत आलिशा नाईकने ईशाराणी विरुद्धचा पहिला गेम केवळ ९ गुणांच्या मोबदल्यात जिंकत तशी सुरुवातही केली होती. परंतु, ईशाराणीने दुसऱ्या गेममध्ये चकवा देणारे ड्रॉपशॉट्स व दीर्घ रॅलीजमध्ये गुंतवून ठेवत हा गेम आपल्या नावे केला. 

तिसऱ्या गेममध्ये ईशाराणीने मध्यंतरापर्यंत ११- २ अशी मोठी आघाडी घेतली. आलिशाने यानंतर काही गुण मिळविले. पण, पराभव मात्र ती टाळू शकली नाही. ४० मिनिटे चाललेला हा सामना ईशाराणीने ९-२१, २१-१३, २१-१८ असा जिंकत आसामला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तरीही महाराष्ट्राने सुवर्णपदकाची आशा सोडली नव्हती. दुहेरीत त्यांना विजयाची अपेक्षा होती मात्र, अश्मिता व ईशाराणी यांनी प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करताना २१-१९, २१-१३ असे पराभूत केले. 

पुरुष बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत कनार्टकचा एकेरीतील खेळाडू एस. भार्गव याने अनुभवी हर्षिल दाणी याच्याविरुद्ध १८-२१, २१-१९, २१-१५ असा विजय नोंदवत कनार्टकला १-० अशी आघाडी प्राप्त करुन दिली. पहिल्या गेममध्ये के. पृथ्वी रॉय याने रोहन गुरबानी याच्याविरुद्ध मोठी आघाडी घेतली होती. तिसऱ्या गेममध्ये स्थिती १४-१४ अशी होती. या स्थितीतून गुरबानी याने सलग सात गुण घेत सामना महाराष्ट्राला जिंकून दिला. 

यामुळे महाराष्ट्राने १-१ अशी बरोबरी साधली. कनार्टकची पुरुष दुहेरीतील अनुभवी दुकली. एचके नितीन व के. साई प्रतीक यांनी दीप रांभिया व अक्षन शेट्टी यांच्यावर २१-१२, २१-१४ असा विजय मिळवत कनार्टकला २-१ असे आघाडीवर नेले. जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेच्या कांस्य पदक विजेत्या आयुष शेट्टी याने यानंतर दर्शन पुजारी याचा २१-१७, २१-१७ असा पराभव करत कनार्टकला सुवर्ण पदक मिळवून दिले.
 

Web Title: Assam's first gold in National Games; Karnataka gold medalist in men's category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा