ऑनलाइन लोकमत
इंचियोन, दि. २९ - आशियाई स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतासाठी सुवर्ण दिवसच ठरला असून आज भारताने टेनिस व थाळीफेकमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा व साकेत मयनेनी या जोडीने तर थाळीफेकमध्ये सीमा पूनियाने सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे.
आशियाई स्पर्धेत सोमवारी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट सुरुच ठेवली. टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा व साकेत मयनेनी या जोडीने चिनी ताइपेवर मात करत भारताला सुवर्ण पदक जिंकवून दिले. त्यापूर्वी सीमा पूनियानेही भारताला पाचवे सुवर्ण पदक मिळवून दिले. सोमवारी दोन सुवर्ण पदक मिळाल्याने भारत पदकतालिकेत सहा सुवर्ण, सात रौप्य व २९ कांस्य अशा ४२ पदकांसह पदकतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
सोमवारी भारताला मिळालेली पदकं
> नवीन कुमारला स्टिपलचेसमध्ये (३००० मीटर) कांस्य पदक
> नरसिंह पंचम यादवला कुस्तीमधील ६१ किलोच्या गटात कांस्यपदक
> ओ.पी. जैशला १५०० मीटरमध्ये कांस्य पदक
> टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत साकेत मायनेनी व सनम सिंहला रौप्य पदक, अंतिम सामन्यात कोरियाच्या टेनिसपटूंकडून पराभव स्वीकारावा लागला.