हॅमिल्टन : न्यूझीलंडला डीआरएसचा योग्य वापर करता न आल्यामुळे पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या पहिल्या दिवसाच्या खेळात हाशिम आमला व कर्णधार फॅफ ड्युप्लेसिस यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. न्यूझीलंडने रिव्ह्यूच्या दोन्ही संधी २९ व्या षटकापर्यंत गमावल्या होत्या. त्यानंतर १३ चेंडूंनी ड्युप्लेसिस वैयक्तिक १६ धावांवर असताना चेंडू त्याच्या बॅटला चाटून यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये विसावला, पण पंचांनी त्याला नाबाद ठरविले. आजचा खेळ थांबला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने ४ बाद १२३ धावांची मजल मारली होती. ड्युप्लेसिस ३३ आणि तेम्बा बावुमा १३ धावा काढून खेळपट्टीवर होते. पावसाच्या व्यत्ययामुळे तीन तासांचा खेळ वाया गेला. आज केवळ ४१ षटकांच्या खेळ शक्य झाला. मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. चौथ्या षटकापर्यंत दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सलामीवीर थेनिस डी ब्रुएन (०) आणि डीन एल्गर (५) यांना गमावले होते. न्यूझीलंडने योग्यवेळी डीआरएसचा वापर केला असता तर दक्षिण आफ्रिकेची ३ बाद २८ अशी अवस्था झाली असती. नील वॅगनरने जेपी ड्युमिनीविरुद्ध पायचितचे अपील केले, पण पंचांनी ते फेटाळले. न्यूझीलंडने रेफरलचा वापर केला असता तर ड्युमिनी तंबूत परतला असता. ड्युमिनीने २० धावा केल्या आणि अमलासोबत (५०) तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. ड्युमिनी उपाहारानंतर बाद झाला तर अमला ३२ व्या षटकानंतर तंबूत परतला. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री व कोलिन डी ग्रँडहोम यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)
आमला, ड्युप्लेसिसने डाव सावरला
By admin | Updated: March 26, 2017 00:51 IST