मुंबई : दादरच्या अमरहिंद मंडळाने वरळीच्या गोल्फादेवी मंडळाचा ३२-१६ अशा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. या विजयाच्या जोरावर अमर हिंद मंडळाने मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद कुमारी गट कबड्डी स्पर्धेत, ‘लक्ष्मीबाई चव्हाण स्मृती चषका’वर नाव कोरले.वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरातील मैदानात स्पर्धेचे सामने पार पडले. अमर हिंद संघाच्या तेजश्री सारंग व प्रियांका पवार यांनी पहिल्या डावात दमदार खेळ करत, प्रतिस्पर्धी संघावर लोन देत १६-७ अशी निर्णायक आघाडी घेतली. मध्यांतरानंतर गोल्फादेवीच्या चढाईपटू जागृती घोसाळकर, अश्विनी जंगम व साक्षी जंगम यांनी काही अंशी सुंदर खेळ करत, सामन्यात परतण्याचे प्रयत्न केले, पण अमर हिंदने सांघिक खेळाच्या जोरावर दुसरा लोनसह १६ गुणांनी मात करत, स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गोल्फादेवी प्रतिष्ठानने अंकुर स्पोटर््स क्लबवर ४३-३९ असा विजय मिळवला, तर अमर हिंद मंडळाने शिवशक्ती महिला संघाला ३३-२८ असे नमवले. दोन्ही डावांत विजयी संघांनी पहिल्या डावात निर्णायक आघाडी घेत, सोप्या विजयाची नोंद केली. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबई कुमारी गट कबड्डी स्पर्धेत अमरहिंद मंडळाला विजेतेपद
By admin | Updated: October 27, 2016 02:59 IST