ऑनलाइन लोकमत
हॉस्टन, दि. १२ - ख्यातनाम माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या ऑल स्टार्स क्रिकेट टी -२० मालिकेच्या दुस-या सामन्यात शेन वॉर्नच्या संघाने सचिन तेंडुलकरच्या संघावर ५७ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघांनी मिळून एकूण ३८ षटकार ठोकले.
अमेरिकेतील होस्टन येथे दुस-या सामन्यात सचिन ब्लास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वॉरियर्सतर्फे कुमार संगकाराने ३० चेंडूत ७० धावांची धडाकेबाज खेळी केली. तर रिकी पॉंटिगने १६ चेंडूत ४१, जॅक कॅलिसने २३ चेंडूत ४५ धावा, मॅथ्यू हेडनने १५ चेंडूत ३२ धावा आणि मायकल वॉनच्या २२ चेंडूत ३३ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला २० षटकांत २६२ धावांचा डोंगर उभारुन दिला.
वॉरियर्सच्या २६३ धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या सचिन्स ब्लास्टर्सच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. शॉन पोलॉकची ५५ धावांची खेळी वगळता अन्य कोणताही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. सचिन तेंडुलकर, विरेंदर सेहवाग, सौरव गांगुली, ब्रायन लारा हे सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले.