नवी दिल्ली : २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन भारतात अहमदाबाद शहरात करण्याची शिफारस राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कार्यकारी मंडळाने बुधवारी आपल्या आमसभेला केली. २६ नोव्हेंबर रोजी ग्लास्गो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल आमसभेत यावर शिक्कामोर्तब केले जाईल. यजमान स्थळासाठी भारताला नायजेरियाने आव्हान दिले होते. तथापि राष्ट्रकुल क्रीडा बोर्डाने आफ्रिकन देशाचा २०३४ च्या स्पर्धेसाठी विचार केला जाईल, असे स्पष्ट केले.
राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाने बुधवारी दुजोरा देत म्हटले की, ‘२०३० च्या शताब्दी वर्ष राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी अहमदाबाद शहराची यजमान शहर म्हणून शिफारस करण्यात येत आहे.’ अहमदाबाद शहराची २०३० चा यजमान म्हणून आम्ही शिफारस करीत आहोत. अहमदाबाद शहराच्या यजमानपदाबाबतचा अंतिम निर्णय २६ नोव्हेंबर रोजी ग्लास्गो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा आमसभेत घेतला जाणार् असल्याची माहिती राष्ट्रकुल आयोजकांनी दिली आहे. भारताने याआधी २०१० साली नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती.
१९३०साली पहिल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कॅनडाच्या हॅमिल्टन शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. आता ९९ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन २०२६ साली ग्लास्गो येथे होणार आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अहमदाबादचा अंतिम प्रस्ताव २९ ऑगस्ट २०२५ रोजी पाठविला त्यानंतर आयओएने ३१ ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव राष्ट्रकुल समितीकडे पाठविला.
शताब्दी महोत्सवी आयोजन१९३० मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडाचे २०३० हे शताब्दी वर्ष असेल. राष्ट्रकुलमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत हा गौरवशाली क्रीडा इतिहास आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बलाढ्य विक्रम असलेला देश आहे. भारताने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा २०२२ मध्ये पदकतालिकेत चौथा क्रमांक मिळवला होता. कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष डॉ. पी. टी. उषा म्हणाल्या, ‘अहमदाबादमध्ये शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद मिळणे, भारताचा मोठा सन्मान असेल. हे आयोजन भारताच्या जागतिक दर्जाच्या क्रीडा व आयोजन क्षमतेचे प्रदर्शन करेल, शिवाय ‘विकसित भारत २०४७’च्या दिशेने अर्थपूर्ण भूमिका बजावेल. आम्ही २०३० चे आयोजन युवांना प्रेरित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यासाठी आणि सामुदायिक भविष्यात योगदान देण्याची प्रभावी संधी म्हणून पाहतो.’
संधी मिळण्याची दाट शक्यताकेंद्र सरकारने अहमदाबाद येथे मोठ्या प्रमाणावर क्रीडा सुविधा उभारण्यास गुजरात सरकारला मदत केली आहे. शहरात आधीपासूनच जगातील सर्वांत मोठे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम आहे. याशिवाय सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एनक्लेव्हमध्ये एक्सलन्स सेंटर, फुटबॉल स्टेडियम आणि इनडोअर स्पोर्ट्स एरिना आहे. याच शहरात पुढे २०३६ ला ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचे स्वप्न असल्याने राष्ट्रकुल क्रीडा आयोजन ही रंगीत तालीम ठरणार आहे. स्पर्धा आयोजनामुळे उद्योग, रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळेल.
Web Summary : Ahmedabad is recommended to host the 2030 Commonwealth Games. The final decision will be made in Glasgow. India previously hosted in 2010. The games coincide with the centenary, boosting sports and tourism.
Web Summary : अहमदाबाद को 2030 राष्ट्रमंडल खेलों की मेजबानी के लिए सिफारिश की गई है। अंतिम निर्णय ग्लासगो में होगा। भारत ने पहले 2010 में मेजबानी की थी। खेल शताब्दी वर्ष के साथ मेल खाते हैं, जिससे खेल और पर्यटन को बढ़ावा मिलेगा।