मुंबई : मुंबईत झालेल्या निर्णायक सामन्यात कर्णधार एबी डीव्हिलियर्ससह दक्षिण आफ्रिकेच्या सर्वच फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. क्विंटन डिकॉक, फाफ डू प्लेसिस आणि डीव्हिलियर्र्स यांना त्यांचे श्रेय मिळायलाच हवे. माझ्या मते, डिव्हिलीयर्सने शानदार फटकेबाजी केली, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे कौतुक करताना मालिका विजयाचे श्रेय त्यांना बहाल केले.सचिनने खासकरून डीव्हिलियर्सचे कौतुक करताना सांगितले, की सुरुवातीचे २० चेंडू पाहिल्यास डीव्हिलियर्स इतक्या आक्रमकतेने खेळत नव्हता. त्याने डावाला कशा प्रकारे वेग द्यायचा, हे ठरविले होते आणि ते काम त्याने अप्रतिमरीत्या केले. त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याचे श्रेय मी त्याला देतो. त्याचबरोबर नक्कीच डिव्हिलीयर्स एक सर्वोत्तम फलंदाज असून, तो आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो अद्भुतरीत्या खेळत असून, त्याच्याकडे पाहून असे वाटते, की इतर कोणत्याही फलंदाजांच्या तुलनेत त्याच्याकडे अधिक वेळ आहे, अशा शब्दांत सचिनने डीव्हिलियर्सची स्तुती केली.आॅलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश होण्यासाठी सचिनने समर्थन केले आहे. त्यासाठी टी-२० प्रारुप सर्वश्रेष्ठ असल्याचे त्याने सांगितले. सध्या गाजत असलेल्या शास्त्री-नाईक वादावर मात्र सचिनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. (वृत्तसंस्था)
विजयाचे श्रेय आफ्रिकी फलंदाजांना
By admin | Updated: October 27, 2015 23:51 IST