प्राची सोनावणे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत ४१८ उमेदवारांपैकी २० ते ४० वर्षे वयोगटातील ५० तरुण उमेदवार विजयी ठरले. शहराचे भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यंग ब्रिगेडला मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. राजकारणासारख्या क्षेत्रातून समाजकार्य करण्यासाठी, तसेच चांगले बदल घडविण्याची संधी मिळाल्याने या विजयी तरुण उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक-८मधील प्रिया विजय भोईर या सर्वात कमी वयाच्या नगरसेविका ठरल्या. घराण्याचा राजकीय वारसा जपणारे हे तरुण आता नगरसेवकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. राजकारणातला फारसा अनुभव नसला, तरीदेखील काम करण्याची वृत्ती, घरातील वडीलधाऱ्यांकडून मिळालेले राजकारणाचे बाळकडू आणि काम करण्याच्या नव्या अंदाजाच्या जोरावर या उमेदवारांना चांगली मते मिळाल्याचे दिसून येते. या विजयी उमेदवारांमध्ये २१ ते ४० वयोगटातील उमेदवारांचा समावेश आहे. निवडून आलेले हे तरुण उमेदवार शहराच्या विकासाकरिता नक्कीच हातभार लावत असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालिका निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांना सर्वाधिक पसंती दिली होती. २० ते ३० वर्षे वयोगटातील ६६ जण निवडणूक लढवत होते. ३० ते ४० वर्षे वयोगटातील १६१ जणांना उमेदवारी देण्यात आली होती. तरुणाई वेगळ्या नजरेने राजकारणाकडे पाहात आहे. तरुणांचे शिक्षण, कार्यक्षमतेचा वापर शहराच्या विकासासाठी करता यावा व तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी तरुणांना संधी दिली होती. निवडून आलेले तरुण कसे कामकाज करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीमध्ये १९,८५७ मतदारांनी वापरला ‘नोटा’महापालिकेच्या निवडणुकीमध्ये २ लाख ३३ हजार ९५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी तब्बल १९ हजार ८५७ जणांनी ‘नोटा’चा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘नोटा’ वापरणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून सर्वच राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत २० प्रभागांमध्ये एकूण ४ लाख २५ हजार ४६४ मतदारांची नावे यादीमध्ये होती. यापैकी २ लाख ३३ हजार ९५ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले होते. यामध्ये १ लाख ४ हजार ७३७ महिला व १ लाख २८ हजार ३५८ पुरूष मतदारांचा समावेश होता. पहिल्या निवडणुकीमध्ये ५५ टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला होता. यापैकी तब्बल १९ हजार ८५७ जणांनी ‘नोटा’चा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास २० हजार मतदारांना एकही उमेदवार पात्र वाटलेला नाही. प्रभाग २० क मध्ये तब्बल ५४२ जणांनी ‘नोटा’ वापरला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये १०० ते ५०० मतदारांनी हा पर्याय वापरलेला आहे.
युवा ब्रिगेडला पसंती
By admin | Updated: May 27, 2017 02:27 IST