मयूर तांबडेपनवेल : उमरोली येथील पुलावरून दुचाकीसह वाहून गेलेल्या दोघांपैकी आदित्य आंब्रे याचा मृतदेह सापडला आहे. मात्र, सारिका आंब्रे यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सलग चार दिवस शोध घेऊनही सारिका यांचा मृतदेह न सापडल्याने अखेर शनिवारी शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यामुळे पुणे येथून आलेली एनडीआरएफची टीमदेखील माघारी परतली आहे.गेल्या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे उमरोली पूल पाण्याखाली गेला होता, या पुलावरून जाताना दुचाकीसह आदित्य आंब्रे व सारिका आंब्रे हे पती-पत्नी वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. पहिले दोन दिवस काहीच पत्ता लागला नाही. पहिल्या दिवशी घटनास्थळी सारिका हिच्या चप्पल आढळून आल्या. पनवेल येथील निसर्ग मित्र संस्था व अग्निशमन दलाच्या जवानांनीही मृतदेहांचा शोध घेतला. मात्र, त्यांना यश आले नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० जुलै रोजी एनडीआरएफची टीम व बॉर्डर सिक्युरिटी संस्था घटनास्थळी दाखल झाली. या टीमने शर्थीचे प्रयत्न करीत वाहून गेलेली मोटारसायकल शोधून काढली. मात्र, वाहून गेलेल्या दोघांचा शोध लागला नाही. ११ जुलै रोजी सकाळी एनडीआरएफच्या ३५ जणांच्या टीमने पुन्हा शांतिवन येथून मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. शांतिवन ते नेरे येथील गाढी नदीच्या मध्यभागी त्यांना आदित्य आंब्रे यांच्या अंगावरील रेनकोट सापडून आला. त्यामुळे शोधमोहीम अधिक जोरात करण्यात आली. पुणे येथील एनडीआरएफ, सिडको अग्निशमन दल, पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयामार्फत तिसºया दिवशीही शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, पनवेल कोळीवाडा येथील हरिचंद्र (हारू) भगत, प्रमोद भगत, कमलाकर कोळी, मनोज कोळी, कृष्णा कोळी या मच्छीमारांनीही या मोहिमेत भाग घेतला. अखेर तिसºया दिवशी कामोठे-जुई खाडीत मच्छीमारांना आदित्य आंब्रे याचा मृत्यदेह आढळून आला. त्यांनी ताबडतोब संबंधितांना याची माहिती दिली. मृतदेह खाडीतून काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्याच्यावर उमरोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. चौथ्या दिवशी म्हणजेच १२ जुलै रोजी एनडीआरएफच्या टीमने उमरोली ते खाडीपर्यंत पुन्हा शोधमोहीम राबवली. मात्र, सारिका आंब्रे हिचा मृतदेह सापडला नाही. एनडीआरएफच्या टीमने शोधमोहीम थांबवली आहे.
वाहून गेलेली ‘ती’ महिला बेपत्ताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:18 IST