नवी मुंबई : नवजात बालकाला प्रवासी महिलेच्या ताब्यात देऊन महिलेने पळ काढल्याची घटना सीवूड स्थानकात घडली आहे. याप्रकरणी महिलेवर वाशी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानकातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून सदर महिलेचा पोलिस शोध घेत आहेत.
हार्बर मार्गावर सीवूड रेल्वे स्थानकात सोमवारी दुपारी १२च्या सुमारास मुंबईहून पनवेलला जाणारी लोकल आली. यावेळी महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या दिव्या नायडू व भूमिका माने यांच्याकडे एका महिलेने रेल्वेतून उतरताना मदत मागितली. या महिलेने हातात साधारण १५ दिवसांचा मुलगा घेतला होता. त्याच्यासह सामान घेऊन स्थानकात उतरण्यात अडचण येत असल्याचा बहाणा करत त्या महिलेने त्याला दिव्या नायडू यांच्याकडे दिले. त्यानंतर सीवूड स्थानकात दिव्या नायडू व त्यांची मैत्रीण बाळासह रेल्वेतून उतरल्या. मात्र, ती महिला रेल्वेतून न उतरता पुढे निघून गेली.
याबाबत नायडू यांनी तक्रार केली असता रेल्वे पोलिसांनी ते बालक ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून ते सीडब्ल्यूसीमार्फत बालकाश्रमात ठेवले जाणार आहे. या बालकाला जाणीवपूर्वक दुसऱ्या महिलेच्या ताब्यात देऊन पळून गेलेल्या महिलेवर गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले.