नारायण जाधव उपवृत्तसंपादक
नवी मुंबई पालिकेवरील गेली २० वर्षे असलेल्या गणेश नाईक यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिंदेसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. दोघेही महायुतीचा भाग असले तरी एकमेकांना शह देण्याची एकही संधी ते सोडत नसल्याचे चित्र आहे. नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून शिंदेसेनेस डिवचल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी विजय नाहटा यांना पक्षात घेऊन जिल्हाप्रमुख किशाेर पाटकर यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील महाविकास आघाडीचे १२ माजी नगरसेवक गळाला लावून ताकद वाढविली आहे. यामुळे शिंदेसेना नगरसेवक फोडून गणेश नाईक यांचा वारू रोखेल काय, ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
राज्याच्या सत्तेत आणि ठाणे जिल्ह्यातील आमदार संख्याबळात भाजप मोठा भाऊ आहे. परंतु, महापालिकांमध्ये मात्र शिंदेसेनेचा बोलबाला आहे. परंतु, आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजपचा नारा गणेश नाईक यांनी दिला आहे. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई या सहा महापालिकांमध्येच फक्त आणि फक्त कमळ फुलविण्याचा भाजपचा इरादा आहे.
स्थानिक पातळीवर तो वाटतो तितका सोपा नाही. कारण जिल्ह्यात शिंदेसेनेची ताकद मोठी आहे. परंतु, महामुंबईतील मुंबईनंतर सक्षम महापालिका म्हणून नवी मुंबई महापालिकेकडे पाहिले जाते. ही महापालिका सर्वच बाबतीत जिल्ह्यातील इतर महापालिकांपेक्षा उजवी आहे. ठाणे महापालिकेसही ठेकेदारांची देणी देण्यासाठी सरकारकडून कर्ज घ्यावे लागले आहे. मात्र, नवी मुंबई महापालिकेवर गेली २० वर्षे पक्ष कोणताही असो, परंतु सत्ता ही नाईकांकडे आहे. नाईक आता वनमंत्री आहेत, तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून दोन्ही वेळेस शहरांच्या जडणघडणीत महत्त्वाचे समजले जाणारे नगरविकास खाते त्यांच्याकडेच आहे. या माध्यमातून शिंदेंनी नाईक यांची पुरती नाकाबंदी केली आहे. नवी मुंबई महापालिकेत विभाग अधिकाऱ्यांपासून ते आयुक्तांपर्यंत सर्व त्यांच्या मर्जीतील समजले जातात.
नगरसेवक का फुटले?
नवी मुंबईत नाईक यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. यामुळे शिंदेसेनेने किशोर पाटकर यांच्या माध्यमातून काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गटाचे १२ माजी नगरसेवक गळाला लावले. यात पक्षाचे महत्त्वाचे नेते विजय चौगुले कोठेच दिसले नाहीत. परंतु, तरीही कुणाला अर्थकारणाचे, तर कोणाला ठेकेदारी आणि कोणाला पुनर्विकासाच्या फायली क्लिअर करून देण्याच्या बळावर गळाला लावल्याची चर्चा आहे. लवकरच भाजपचेही नगरसेवक येतील, असा दावा पाटकरांनी केला आहे. ते खरे ठरले तर नाईक यांची वाट बिकट होऊ शकते. परंतु, ‘सौ सुनार की एक लोहार की’ हे विसरू नका, असे नाईक यांचे समर्थक म्हणत आहेत.