लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : जागतिक पातळीवर देश बलशाली होत असतानाच, देशाच्या प्रगतीवर हल्ला करू पाहणाऱ्या अदृश्य शक्तींकडून ड्रग्जच्या आहारी ढकलून देशाचे भवितव्य उद्ध्वस्त केले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पंजाबसारख्या सीमावर्ती राज्याची तरुणाई ड्रग्समुळे कमकुवत करण्याचे काम सुरूआहे. महाराष्ट्रात ड्रग्जविरोधी अभियान राबवले जात असून, त्याची सुरुवात नवी मुंबईतून होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूत्रे हाती घेताच ड्रग्जविरोधी अभियानाची संकल्प व्यक्त केली होती. त्यानुसार नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पुन्हा एकदा शहरात नव्याने ‘ड्रग्ज फ्री नवी मुंबई’ अभियान हाती घेतले आहे. त्याचा शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, प्रसिद्ध अभिनेते व अभियानाचे ॲम्बेसेडर जॉन अब्राहम यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आयुक्तांच्या नेतृत्वाचे केले कौतुक
- याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील, महेश बालदी उपस्थित होते. यावेळी अभियानाचा ब्रँड ॲम्बेसेडर जॉन अब्राहम यानेही उपस्थित तरुण, तरुणींना ड्रग्जला बळी न पडण्याचे आवाहन केले.
- पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनीही शहरात सायबर गुन्हे व ड्रग्स विक्रीला आळा घालण्यासाठी प्रभावी अभियान राबवले जात असून त्यासाठी जनजागृतीवर देखील भर दिला जात असल्याचे सांगितले.
- वनमंत्री गणेश नाईक यांनी एपीएमसी मार्केटमध्ये परराज्यातून ड्रग्ज आणला जात असल्याचे वक्तव्य करून एपीएमसी पोलिसांकडून कारवाया करून गुन्हेगारांचे मनसुबे उधळले जात असल्याचेही सांगून आयुक्तांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभर ड्रग्जविरोधी अभियान राबवले जात असून, महाराष्ट्रातदेखील त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. देशाच्या प्रगतीवर हल्ला करू पाहणाऱ्यांकडून तरुणाईला नशेच्या आहारी ढकलले जात आहे. मात्र, तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या नशेला बळी न पडता जॉन अब्राहम यांच्यासारखा आदर्श बना.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री