धोकादायक इमारतींतील रहिवाशांनी करायचे काय?, पनवेल पालिकेच्या महासभेत पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:02 AM2020-09-19T00:02:32+5:302020-09-19T00:03:31+5:30

पालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती आहेत. तर, ग्रामीण भागात २९ गावांतील जुन्या घरांचा पुनर्बांधणीचा प्रश्न प्रलंबित आहे. याचे पडसाद महासभेत उमटले.

What do the residents of dangerous buildings want to do? | धोकादायक इमारतींतील रहिवाशांनी करायचे काय?, पनवेल पालिकेच्या महासभेत पडसाद

धोकादायक इमारतींतील रहिवाशांनी करायचे काय?, पनवेल पालिकेच्या महासभेत पडसाद

Next

- वैभव गायकर

पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात विविध ठिकाणच्या इमारती पालिकेने धोकादायक ठरविल्या आहेत. हजारो नागरिकांना घरे खाली करण्याच्या सूचना पालिकेने केल्या असून, याचे पडसाद दि.१८ रोजी पार पडलेल्या पालिकेच्या आॅनलाइन महासभेत उमटले.
पनवेल पालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली. या सभेत लक्षवेधीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. धोकादायक इमारतीचे पालिकेने स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी गायकवाड यांनी केली, तसेच या संदर्भात एक समितीही स्थापन करण्याची मागणी केली आहे.
पालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती आहेत. तर, ग्रामीण भागात २९ गावांतील जुन्या घरांचा पुनर्बांधणीचा प्रश्न प्रलंबित आहे. याचे पडसाद महासभेत उमटले. खांदा कॉलनीत दररोज जुन्या मोडकळीस आलेल्या घरांचे स्लॅब कोसळत असल्याचे सभापती संजय भोपी यांनी सांगितले. यावेळी, स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची जबाबदारी संबंधित जागा मालकांची आहे. याकरिता पालिका खर्च करू शकत नाही. ३० वर्षे जुन्या इमारतींमधील रहिवाशांनी स्वत:च इमारतीचा आॅडिट रिपोर्ट सादर करणे, अनिवार्य असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले.
या व्यतिरिक्त कोविडसंदर्भातही सविस्तर चर्चा महासभेत पार पडली. नगरसेवक हरेश केणी यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव उपस्थित केला होता. त्या प्रस्तावाला महापौरांनी त्वरित मंजुरी दिली. या व्यतिरिक्त पालिकेच्या मुख्यालयाच्या उभारणीचा विषय, पालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान, पालिका क्षेत्रात आंतराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
प्रभाग अधिकारी निष्क्रिय
एकीकडे कोविडने नागरिक हैराण झाले असताना, पालिका क्षेत्रातील प्रभाग अ चे अधिकारी दशरथ भंडारी आपली जबाबदारी झटकून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा मुद्दा नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी उपस्थित केला. कोविडव्यतिरिक्त प्राथमिक सुविधांचा प्रश्न महत्त्वाचा असून, याकडे दुर्लक्ष करणारे प्रभारी प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांना समज देण्याची विनंती नगरसेवक गायकर यांनी आयुक्त देशमुख यांच्याकडे उपस्थित केली.

सॅनिटायझर नॅपकिन मशीन पडले धूळखात
पालिकेने खरेदी केलेली सॅनिटरी नॅपकिन मशीन धूळखात पडले आहेत. याबाबत पालिका प्रशासनाने या मशीन योग्य जागेवर लावाव्यात, अशी सूचना महापौर डॉ.कविता चौतमोल यांनी सभेत केली.

कोविडचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसाला ३०० रुग्ण सापडत असताना, सत्ताधारी पक्षाला क्रिकेट अकादमी, मुख्यालयाचा प्रश्न महत्त्वाचा वाटत आहे. एकीकडे कोविड रुग्णांना उपचार मिळत नाही, म्हणून आम्ही मागणी करूनही हे प्रश्न स्थगित न करता, त्यांना मंजूर करण्यात आले. त्यामुळे कोविडबाबत सत्ताधारी गंभीर नाहीत.
- प्रितम म्हात्रे (विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका)

कोविडच्या परिस्थिती खासगी रुग्णालयांनी बाजार मांडला आहे. २ लाख रुपये डिपॉझिटची मागणी रुग्णालयात करीत आहेत. नगरसेवकांना आपल्या घरच्या सदस्यांसाठी रुग्णालयात जागा उपस्थित करू शकत नाही, तर सर्वसामान्यांचे काय? याबाबत पालिकेने ठोस निर्णय घ्यावा.
- हरेश केणी (नगरसेवक)

ग्रामीण भागात प्रॉपर्टी कार्डबाबत लवकरात लवकर निर्णय पालिकेने घ्यावे, अन्यथा ग्रामीण भागातील मोडकळीस आलेली घरे पडून अनेकांचे जीव जातील. एकीकडे लोकांचे जीव जात आहेत, लोकांना हॉस्पिटलची गरज असताना, सत्ताधाऱ्यांना क्रिकेट अकादमी जास्त महत्त्वाची वाटते, हे दुर्दैव आहे.
- अरविंद म्हात्रे (नगरसेवक, शेकाप)

पालिकेने जुनी घरे मोडण्यास परवानगी दिली. मात्र, पुनर्बांधणीला परवानगी दिली नसल्याने घरांच्या अभावी शेकडो तरुण-तरुणींची लग्ने रखडली आहेत. केवळ घरे नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याने पालिकेने ग्रामीण भागात घरांच्या उभारणीला परवानगी द्यावी. - प्रवीण पाटील
(स्थायी समिती सभापती,
पनवेल महानगरपालिका )


धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. पालिकेने याकरिता सविस्तर माहितीसाठी, तसेच नागरिकांच्या जीविताचा विचार करता, समिती स्थापन करून नगरसेवकांना यामध्ये स्थान द्यावे.
- जगदीश गायकवाड
(उपमहापौर, पनवेल महानगरपालिका)

सिडकोने दहा वर्षांत वास्तुविहार, सेलिब्रेशन हे गृहप्रकल्प उभारून दहा वर्षे होत नाहीत, तीच पालिकेने या प्रकल्पातील घरे धोकादायक ठरवली आहेत. सिडकोने येथील रहिवाशांच्या जिवाशी खेळ मांडला आहे.
- संजना कदम
(नगरसेविका, भाजप)

Web Title: What do the residents of dangerous buildings want to do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल