मतदार नोंदणी संशयाच्या घेऱ्यात; निवडणुकीपूर्वीची धांदल, चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 12:13 AM2021-02-24T00:13:04+5:302021-02-24T00:13:14+5:30

निवडणुकीपूर्वीची धांदल : चौकशी करण्याची मागणी

Voter registration under suspicion | मतदार नोंदणी संशयाच्या घेऱ्यात; निवडणुकीपूर्वीची धांदल, चौकशी करण्याची मागणी

मतदार नोंदणी संशयाच्या घेऱ्यात; निवडणुकीपूर्वीची धांदल, चौकशी करण्याची मागणी

googlenewsNext

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर होणारी मतदार नोंदणी संशयाच्या घेऱ्यात येत आहे. प्रतिवर्षी केल्या जाणाऱ्या या नोंदणीत मोठ्या प्रमाणात सोयीनुसार मतदारांची अदलाबदल होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे नोंदणी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

कोरोनामुळे एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पंचवार्षिक निवडणुकीच्या आनुषंगाने नुकतीच मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु, एक वर्षांपूर्वी पालिकेने प्रसिद्ध केलेली प्रारूप यादी व नुकतीच प्रसिद्ध झालेली यादी यात मोठी तफावत समोर येऊ लागली आहे. त्यामुळे मतदारांचा शोध घेण्यात इच्छुक उमेदवारांची दमछाक होऊ लागली आहे. परिणामी, निवडणुकीच्या पूर्वसंध्येवर होणारी मतदार नोंदणी वादात सापडत आहे. प्रत्येक निवडणूकपूर्वी मतदार यादीतील घोळ समोर येत असल्याने निवडणुकीच्या सहा महिने अगोदर नवी नोंदणी बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे. 

घणसोली येथील प्रभाग ३३मध्ये अवघ्या एक वर्षात चार हजारांहून अधिक मतदारांची वाढ झाली आहे. २०१५ मध्ये या प्रभागात ४ हजार ३३९ मतदारांची नोंद होती. तर गतवर्षी जाहीर झालेल्या प्रारूप यादीत ५ हजार १०० मतदार होते. मात्र, नुकतेच प्रसिद्ध झालेल्या यादीत तब्बल ९ हजार ४६२ मतदारांची नोंद झाली आहे.  अशाच प्रकारे प्रभाग ४६ मधील सुमारे ४०० मतदार हे प्रभाग ३७ मध्ये वळवण्यात आले आहेत.

घणसोली सेक्टर ४ येथील अण्णासाहेब पाटील सोसायटीत ७८ घरे असताना मतदारांची नोंद मात्र ३५०० दाखविण्यात आली आहे. त्यापैकी बहुतांश मतदारांचे पत्ते हे अपूर्ण असल्याने त्यांचा शोध लावायचा तरी कसा, असाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे हे मतदार अचानक येतात कुठून ? असा प्रश्न उपस्थित होत असतो. त्यामुळे अनेक उमेदवार सोयीच्या प्रभागांनुसार मर्जीतल्या मतदारांची फिरवाफिरव करत असल्याची शंका उपस्थित होत आहे. 

Web Title: Voter registration under suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.