- नामदेव मोरे
नवी मुंबई - खोटी बिले लावून जीएसटीची चोरी करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. त्यांनी ४८ कोटी ८ लाख रुपयांची करचोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना अटक केली असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
महाराष्ट्र वस्तु व सेवाकर अन्वेषण विभाग रायगड नोडल १ च्या पथकाने ही कारवाई केली आहे. बोगमाल्लो एंटरप्रायझेस व मार्करीच अपेरल कंपनीच्या अभिजीत वझे व श्रेयस सावंत या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या कंपनीच्या कामकाजाची तपासणी केली असता त्यांनी पुरवठादाराकडून प्रत्यक्षात कोणत्याही मालाचा पुरवठा न घेता आयटीसीचा लाभ मिळविल्याचे निदर्शनास आले. दोघांनी ४८ कोटी ८ लाख रुपयांची करचोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र वस्तु व सेवाकर कायदा, केंद्रीय वस्तु व सेवाकर कायदा२०१७ चे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.
करचोरीविरोधातील कारवाई सहाय्यक राज्यकर आयुक्त अप्पासाहेब पाटील व रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महेश कुलकर्णी, विनोद देसाई, मनोहर सावेडकर, राज्यकर निरीक्षक नंदकिशाेर भुसारे, संतोष झोरे, सुमित उमरे, राहुल दंदी, नदीम शेख, मन्मथ वाळके, भीमराव खेडकर, श्रीहरी गोसावी, विशाल पिचड, तेजस्वीता नाईकरे, मयुर मंडलिक यांच्या पथकाने केले.