लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वाशीतील फोर्टीज हिरानंदानी रूग्णालयात पालिकेच्या माध्यमातून खोटा उत्पन्नाचा दाखला देवून उपचार घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुकशेतमधील जयदास म्हात्रे यांनी खोटा दाखला दिल्याचे निदर्शनास आले असून पालिकेने त्यांच्याविरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई महापालिकेने वाशी प्रथम संदर्भ रूग्णालयामधील जागा फोर्टीज हिरानंदानी रूग्णालयास भाडेतत्त्वावर दिली आहे. येथे महापालिकेच्यावतीने पाठविण्यात येणाऱ्या रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची अट आहे. कुकशेतमधील मकरंद म्हात्रे या युवकाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते. तीन टप्यात झालेल्या उपचारादरम्यान जवळपास १७ लाख रूपये खर्च झाले होते. मकरंदचे वडील जयदास यांनी तहसीलदाराकडून ८० हजार रूपये उत्पन्न असल्याचा दाखला सादर केला होता. यामुळे मोफत उपचाराचा लाभ घेण्यात आला होता. याविषयी माहितीच्या अधिकाराचा वापर करून लाभार्थीच्या उत्पन्नाविषयी तपशील मागविण्यात आला होता. उत्पन्नाचा दाखला व प्रत्यक्ष उत्पन्न यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी सुनावणी घेवून लाभार्थीला त्याचे म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. पण याविषयी समाधानकारक माहिती दिली नसल्याने वैद्यकीय अधिकारी वसंत माने यांनी गुन्हा दाखल केला आहे. मोफत उपचाराचा लाभ घेण्यासाठी खोटा उत्पन्नाचा दाखला दिल्याचा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. वास्तविक महापालिकेच्या योजनेचा लाभ आतापर्यंत एकाही गरीब रूग्णास झालेला नाही.
खोटा दाखला देऊन घेतले उपचार
By admin | Updated: May 25, 2017 00:28 IST