लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महापे येथील कार्तिक जाधव (वय १४) याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी तुर्भे पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला अटक केली आहे. घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना दहा दिवसांच्या कसून तपासानंतर पोलिसांनी वाहनाची ओळख पटवून त्याच्या मुसक्या आवळल्या. अपघातानंतर त्याने मालकासोबत केलेल्या चॅटिंगवरून अपघाताचा उलगडा झाला.
महापे येथील पुलावर २६ मार्चला सकाळी अपघात झाला होता. दहावीची परीक्षा दिलेला कार्तिक पुलावरून चालत जाताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली होती. घटनास्थळी दहा मिनिटे व रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी विलंब झाल्याने गोल्डन अवरमध्ये त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. परिणामी, दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी व या मार्गावर कुठेही सीसीटीव्ही नसल्याने अपघात करणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई सचिन पाटील, राजेश आघाव, सुनील सकट, किरण घुगे, श्रीकांत खेडकर हे तपास करत होते. त्यांनी शीळफाटा मार्ग व ठाणे-बेलापूर मार्गावरून अपघाताच्या वेळेत गेलेल्या वाहनांचा आढावा घेतला. त्यामध्ये महापे येथून वाशी टोलनाकापर्यंतच्या अनेक वाहनांमधून संशयित टेम्पो ट्रॅव्हलरचा नंबर मिळवला.
गाडी धडकल्याचे सांगितले मालकाला अपघाताच्या दिवशी शीळफाटा येथून मुंबईकडे हा टेम्पो गेला होता. टेम्पोचा अपघात झाल्याची माहिती नसल्याचे मालकाने सांगितले; परंतु गाडी धडकली असून, त्याचे काम करून घेत असल्याचे चालकाने मालकाला चॅटिंगवरून कळवले. शिवाय गाडीचा पुढचा भाग दबल्याचे फोटोही पाठवले. मालकाने हे चॅटिंग पोलिसांना दाखवताच त्यांनी चालकाला ताब्यात घेतले.
गाडीत लावलेला जीपीएसमहापे पुलावरून पहाटे गाडी घेऊन जाताना चालकाला डुलकी लागली. यात कार्तिकला त्याची धडक लागली होती. मात्र, अपघातानंतर पळ काढून गाडीची दुरुस्ती करून मालकापासूनही अपघात लपवला. गाडीत जीपीएस असल्याने अपघाताच्या वेळेत गाडी तिथून गेल्याचे स्पष्ट झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.