नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर वाशीतील पुलाच्या दुरुस्ती कामानिमित्ताने सदर मार्गावरील वाहतूक पामबीचमार्गे वळवण्यात आली होती. परंतु पोलिसांना चकमा देत पुन्हा सायन-पनवेल मार्गावर येण्याच्या वाहनचालकांच्या प्रयत्नामुळे सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी परिस्थिती हाताळत अनेकांची कोंडीतून सुटका केली.सायन-पनवेल मार्गावरील वाहतुकीत शनिवारी बदल करण्यात आला होता. यादरम्यान सदर मार्गाने जाणारी वाहने पामबीचमार्गे सीबीडीकडे वळवण्यात आली होती. तशा सूचना वाहणचालकांना वाशीमधूनच दिल्या जात होत्या. परंतु वाहतूक पोलिसांना चकमा देत पुन्हा सायन-पनवेल मार्गावर गाडी वळवण्याचा अनेक वाहनचालकांचा प्रयत्न चांगलाच कोंडीचा ठरला. वाशी रेल्वे स्थानक ते सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यानचा रोड त्यांनी रहदारीसाठी वापरायला सुरुवात केली. यामुळे नेहमी मोकळ्या असलेल्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात छोटीमोठी वाहने आल्याने सानपाडा ते वाशीदरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाशीतून वळवलेली वाहने पामबीचमार्गे जाणे अपेक्षित होते. परंतु वळवलेली वाहने सर्व्हिस रोडने पुन्हा फिरून सायन-पनवेल मार्गाकडे येत होती. यामुळे सदर मार्गावर चौकाचौकात वाहतूककोंडी झाली होती. पर्यायी तुर्भे वाहतूक पोलिसांना सानपाडा येथे रस्त्यावर उतरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी लागली. तर संध्याकाळनंतर वाहतूककोंडी दूर होऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सर्व्हिस रोडवरही ट्रॅफिक जाम
By admin | Updated: February 28, 2016 04:07 IST