लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ‘माझे पसंतीचे सिडको घर’ योजनेंतर्गत सिडकोने २६ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या घरांसाठी गेल्या वर्षी ११ ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे अर्जनोंदणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवल्याने सर्वसामान्य ग्राहक अद्याप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.
सिडको बांधत असलेल्या ६७ हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यात २६ हजार घरांच्या विक्रीकरिता सिडकोने गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण योजनेसाठी जाहिरात प्रसिद्ध करून ११ नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना नोंदणी करण्यास सांगितले होते. या दरम्यान राज्यात निवडणुकीचा काळ असल्यामुळे ग्राहकांना घर घेण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिडकोने या महागृहनिर्माण योजनेकरिता नोंदणी करण्यासाठी आणखी एक महिन्याची म्हणजेच ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, तर तिसऱ्यांदा १० दिवसांची म्हणजेच १० जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, योजना पुस्तिकेत घरांच्या किमती नमूद नसल्याने ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बजेटनुसार घरांच्या शोधात ‘विघ्न’
- तांत्रिक कारणास्तव घरांच्या किमती जाहीर करण्याचे राहून गेले.
- लवकरच प्रकल्पनिहाय घरांच्या किमती जाहीर केल्या जातील, असे सिडकोच्या संबंधित विभागाकडून वारंवार स्पष्ट केले जात आहे.
- गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर किमती जाहीर केल्या जातील, अशी शक्यता व्यक्त होत होती.
- मात्र, ही शक्यता मावळल्याने बजेटनुसार घराच्या शोधात असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची मोठी पंचाईत झाली आहे.
सर्वाधिक घरे तळोजा नोडमध्ये
२६ हजार घरांपैकी सर्वाधिक म्हणजेच ५० टक्के घरे फक्त तळोजा नोडमध्ये आहेत. विविध कारणांमुळे येथील सिडकोची घरे विकली जात नाहीत. त्यामुळे हजारो घरे आजही विक्रीविना पडून आहेत. शिल्लक राहिलेल्या या घरांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर खांदेश्वर, मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामणडोंगरी गृहप्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश केला आहे. शेवटच्या टप्प्यात याेजनेत समाविष्ट केलेल्या वाशी आणि खारघर रेल्वे स्थानक परिसरातील घरांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे सांगण्यात आले.