जितेंद्र कालेकर , ठाणेकाजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्र मंडळाने यंदा साकारलेले बँकॉकचे (थायलंड) गणेश मंदीर सध्या ठाणेकरांचे आकर्षण ठरले आहे. ‘काजूवाडीचा राजा’ अशी ख्याती झालेल्या या मंडळाच्या गणेशालाही भाविकांची मोठी गर्दी होत आहे.मंडळाचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. कला दिग्दर्शक संदीप वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील समीर भेकरे आणि अभिषेक बनकर यांच्या ४० जणांच्या टीमने बँकॉक येथील एका मॉलच्या बाजूला असलेल्या गणेश मंदीराची प्रतिकृती गेली दीड महिना मेहनत घेऊन साकारली आहे. ८ ते १५ सप्टेंबर या सात दिवसातच २४ बाय ४५ च्या भव्य मंडपाचे काम केले आहे. यासाठी प्रत्येक कामगाराचे मानधन तसेच इतर सामुग्रीसाठी मिळून साडेआठ ते नऊ लाखांचा खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती हे या मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्याच संकल्पनेतून काही तरी नविन करण्याच्या विचारातून बँकॉकचे हे मंदीर साकारले असून त्यामध्ये दहा फूटी ‘काजूवाडीचा राजा’ विराजमान झाला आहे. त्याला साजेशी आकर्षक एलईडी दिव्यांची रोषणाई केली आहे. त्यामुळे वीज बचतीबरोबरच दिव्यांच्या प्रखरतेचाही भाविकांना त्रास होत नाही. यासाठीही दीड ते दोन लाखांचा खर्च केला आहे. मंडळाने अधिकृत वीज जोडणी घेऊनच याठिकाणची रोषणाई केली आहे. मंडळामध्ये महिलांसह १०० पेक्षा अधिक कार्यकर्ते असून २५ पदाधिकारी आहेत. पर्यावरणभिमुख मंदिर उभारणीसाठी कापड, लाकूड फायबरचा वापर केला असून थर्माकोलचा नगण्य वापर केल्याचेही मंडळाचे कार्यकर्ते सांगतात.केवळ भक्तीगीते : गणेशोत्सवाच्या काळात या मंडपामध्ये मंद आवाजात केवळ भक्तीगीते आणि श्लोक, मंत्र यालाच प्राधान्य दिले जाते. सिनेमातील इतर गाण्यांना बंदी घातली आहे. पहिल्या दिवसापासून याठिकाणी बहुभाषिक भजने सादर केली जात आहेत. खड्डेविरहीत मंडप : माजी महापौरांच्या नावाने ओळख निर्माण झालेल्या या मंडळाने शिस्तही तशीच ठेवली आहे. या शिस्तीमुळेच याठिकाणी पत्ते खेळण्यालाही बंदी आहे. स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात येत असतो. त्यामुळे आवारापासून मंदीरात कुठेही कचरा आढळून येत नाही. याशिवाय, खड्डे विरहित मंडप उभारण्याची गेल्या चार वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.सामाजिक बांधिलकी...सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मंडळाने जांभूळपाडा (पाली, रायगड) येथील पूरग्रस्तांना काही वर्षांपूर्वी नऊ हजारांची आर्थिक मदत केली होती. हीच परंपरा कायम ठेवून यंदाही राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मंडळाच्यावतीने आर्थिक मदत केली जाणार असल्याचे वैती यांनी सांगितले.सुरक्षिततेची खबरदारीसुरक्षिततेची खबरदारी म्हणून याठिकाणी पाच सीसीटीव्ही लावलेले आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सतत जागता पहारा असतो. भाविकांना येण्यासाठी प्रशस्त मार्गही आहे.
वैतीनगरात साकारले थायलंडचे गणेश मंदीर
By admin | Updated: September 23, 2015 23:39 IST