- प्राची सोनवणे, नवी मुंबई नऊ वर्षीय वेदान्त विश्वनाथ सावंत आणि १० वर्षीय राज पाटील या दोन्ही जलतरणपटूंनी रविवारी साखळी पद्धतीने पोहून अलिबाग येथील धरमतर जेट्टी ते बेलापूर जेट्टी हा जलप्रवास करून विक्रम नोंदविला. धरमतर ते बेलापूर रेतीबंदर हे ५२ किमीचे सागरी अंतर पार करणारे लहान वयोगटात देशातील पहिले जलतरणपटू ठरले. साखळी पद्धतीने पोहून चिमुकल्यांनी हा जलप्रवास अवघ्या १० तास ४५ मिनिटांत पार केला. या जलतरण स्पर्धेला महाराष्ट्र जलतरण संघटनेचे मान्यता मिळाली असून, ओपन वॉटर सी स्विमिंग क्लब आॅफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी पध्दतीच्या जलक्रीडेचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण प्रशिक्षक संतोष पाटील तसेच प्रशिक्षक संकेत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वेदान्त आणि राज हे दोघेही जलतरणाचा नियमितपणे सराव करतात. धरमतर ते रेवस जेट्टी असे १६ किमीचे सागरी अंतर राजने अवघ्या तीन तासांत पार केले. त्यानंतर केगाव बीच ते जेएनपीटी असे १३ किमीचे अंतर तीन तासांत पार केले. वेदान्तने रेवस जेट्टी ते केगाव बीच हे १२ किमीचे अंतर तीन तासांत पार केले, तर जेएनपीटी ते बेलापूर जेट्टी असे १० किमीचे अंतर अवघ्या १ तास ४५ मिनिटांत पार केले. वादळी वारा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे, भरती-ओहोटी अशी सारी आव्हाने झेलत या दोघांनीही हा यशस्वी प्रवास केल्याची माहिती वेदान्तचे वडील विश्वनाथ सावंत यांनी दिली. वाशीतील फादर एग्नेल शाळेत शिकणारा वेदान्त यापूर्वी एलिफंटा ते गेटवे हे १४ किमीचे अंतर दोन तासांत पार करणारा सर्वात जलद जलतरणपटू ठरला होता. तर केंद्रीय विद्यालय उरण या शाळेत शिकणारा राज पाटील या विद्यार्थ्याने यापूर्वी ८ समुद्रमार्ग पार करून एक विक्रमी नोंद केली. यावेळी या दोघांचेही कौतुक करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर अविनाश लाड, आमदार मंदा म्हात्रे, नगरसेवक राजू शिंदे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दशरथ भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
चिमुकल्या जलतरणपटूंनी रचला इतिहास
By admin | Updated: March 15, 2016 01:19 IST