कोरोना रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचेही राज्यव्यापी अभियान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:46 PM2020-11-19T23:46:28+5:302020-11-19T23:46:48+5:30

२३७ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती : ६० कलमी कार्यक्रमांची चेक लिस्ट 

Statewide campaigns of NGOs to prevent corona | कोरोना रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचेही राज्यव्यापी अभियान 

कोरोना रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचेही राज्यव्यापी अभियान 

Next

 नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी संस्थाही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सावित्री अकादमीच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आतापर्यंत २० जिल्ह्यांमधील २३७ ग्रामपंचायतींमध्ये साठ कलमी कार्यक्रमांची चेक लिस्ट भरून घेतली असून कोरोनापासून गावाचे रक्षण करण्यासाठी जनजागृती सुरू आहे. 


मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला. सुरुवातीला मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसारख्या महानगरांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली व नंतर गावांमध्येही प्रादुर्भाव वाढू लागला. काही गावांमध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले. ग्रामीण महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायती महत्त्वाच्या भूमिका बजावू शकतात हे लक्षात आल्यामुळे शासनाने व सामाजिक संस्थांनीही जनजागृती सुरू केली. वर्धा सेवा ग्राममधील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेने ग्रामपंचायतींसाठी ६० कलमी कार्यक्रमांची चेक लिस्ट तयार केली. सावित्री अकादमी यांनी ही चेक लिस्ट ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशन यूएसए व रिसोर्स ॲण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट यांनीही योगदान दिले आहे. रायगडसह राज्यातील २० जिल्ह्यांमधील तब्बल २३७ ग्रामपंचायतींमधून ती भरून घेण्यात आली आली आहे. यामध्ये गावामध्ये स्वच्छता समितीची स्थापना, कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजना, सहव्याधी असणाऱ्या नागरिकांची काळजी, विलगीकरण व अलगीकरण तसेच विलगीकरण करताना घ्यावयाची काळजी, आरोग्यविषयक सुविधा याविषयी माहिती भरून घेतली जाते.


चेक लिस्ट भरून दिल्यानंतर गावामध्ये कोणत्या सुविधा आहेत, कोणत्या सुविधा असल्या पाहिजेत. काय काळजी घेतली जात आहे व काय काळजी घेतली पाहिजे याविषयी वस्तुस्थितीदर्शक माहिती उपलब्ध होते. यामधून गाव कोरोनामुक्त ठेवण्यास सहकार्य होऊ शकते. कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखायचा याविषयी सखोल माहिती चेक लिस्टमधून मिळत असल्यामुळे जास्तीतजास्त गावांपर्यंत ती पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 

असे आहेत  चेक लिस्टमधील महत्त्वाचे मुद्दे 
n कोरोना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
n आजाराविषयी गावामध्ये असलेले गैरसमज आणि पूर्वग्रह दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजना
n काेरोनाविषयी निरीक्षण व देखरेख करण्यासाठीची पावले
n विलगीकरण व अलगीकरण करताना करावयाचे सहकार्य
n गरजू कुटुंब शोधणे आणि त्यांच्या गरजा निश्चित करणे
n गावात आरोग्य सोयी व सुविधा नियमित उपलब्ध करून देणे
n गावात कोरोना रुग्ण आढळून आल्यास तातडीने उचलायची पावले
n गावांमधील प्रसाधनगृह व गटार व्यवस्थेविषयी घ्यावयाची काळजी


रायगडसह राज्यातील २० जिल्ह्यांमधील २३७ गावांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांना कोरोना रोखण्यासाठीची शपथ देण्यात आली असून चेक लिस्टचा फॉर्म भरून घेण्यात आला आहे. चेक लिस्टमुळे गावात काय उपाययोजना आहेत व काय केल्या पाहिजेत याविषयी माहिती उपलब्ध होऊन योग्य नियोजन करणे शक्य होते.
    भीम रासकर, संचालक - सावित्री अकादमी महाराष्ट्र
 

Web Title: Statewide campaigns of NGOs to prevent corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.