लेख: नवी मुंबईला जे जमते, ते इतरांना का नाही .. ?

By अतुल कुलकर्णी | Published: April 3, 2023 08:26 AM2023-04-03T08:26:38+5:302023-04-03T08:26:58+5:30

स्वच्छतेची मानसिकता एका रात्रीतून येत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नवी मुंबईमध्ये २०१८ पासून या प्रयत्नांना सुरुवात झाली.

Special Article on What Navi Mumbai gets in Cleanliness why not others | लेख: नवी मुंबईला जे जमते, ते इतरांना का नाही .. ?

लेख: नवी मुंबईला जे जमते, ते इतरांना का नाही .. ?

googlenewsNext

अधिकाऱ्यांनी ठरवले तर काय होऊ शकते, यासाठी महाराष्ट्रात अनेक उदाहरणे देता येतील. दूरगामी विचार करणाऱ्या अनेक उत्तम अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला परंपरा लाभली आहे. त्यांनी आपापल्या काळात 'भाइल स्टोन' काम करून ठेवले आहे. अशा अधिकाऱ्यांची यादी केली तर ती खूप मोठी होईल. महाराष्ट्र त्या दृष्टीने भाग्यवान आहे. राजकारण्यांच्या हातातले बाहुले व्हायचे की, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची, याचा निर्णय त्या त्या अधिकाऱ्यांनी स्वतः घ्यायचा असतो. एकदा त्यांनी स्वतःच्या मनाशी ठरवले की, मग त्यांचे विचार, आचार आणि काम त्याच दिशेने होऊ लागते.

१ ऑक्टोबर २०२२ मध्ये जाहीर झालेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात नवी मुंबई भारतात तिसऱ्या क्रमांकावर आले. २०१८ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी देशातून स्वच्छ शहरांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. नवी मुंबईच्या सुंदर दिसण्याला व्हिजन देण्याच्या कामाचे बीजारोपण रामास्वामी यांनी केले. कोविडमुळे काम रेंगाळले. मात्र, त्यांच्या जागी आलेल्या अभिजित बांगर यांनी ते काम पुढे नेले. तरुण, तडफदार अधिकारी अशी बांगर यांची ओळख आहे. संयमी वागणे आणि मनात एखादी गोष्ट पक्की करून त्याचे नियोजन करणे हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे त्यांनी नवी मुंबईला सुंदर करण्याच्या कामाला त्यांनी वेग दिला. बांगर यांची बदली ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून झाली. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले. ३० सप्टेंबर २०१२ रोजी नार्वेकर यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आणि १ ऑक्टोबरला स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला. नवे आयुक्त म्हणून राजेश नार्वेकर पुरस्कार घ्यायला दिल्लीला जाऊ शकले असते. मात्र, तसे न करता तुम्हीच पुरस्कार घेतला पाहिजे, असे सांगून बांगर यांनाच त्यांनी दिल्लीला पाठवले.

हे सांगण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी, नवी मुंबईतील एका उड्डाणपुलाखाली मुले खेळत आहेत. सुंदर रंगरंगोटी केलेली आहे. कुठेही कचरा नाही, असा एक व्हिडीओ ट्रीट केला. नवी मुंबईतील एका हॉस्पिटलने शहरांचा हॅपीनेस इंडेक्स शोधला. त्यात नवी मुंबईचा हॅपीनेस इंडेक्स ८०% च्या वर असल्याचे समोर आले.

नवी मुंबईचे वेगळेपण सांगायला या दोन घटना पुरेशा आहेत, बांगर यांच्या जागी आलेल्या राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. कोणावरही आरडाओरड न करता. सुरू शांतपणे मात्र तितक्याच खंबीरपणाने त्यांनी कामांना वेग दिला. ज्या ज्या ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा • आहेत. त्या शोधून तेथे चांगले काय करता येईल याचा आराखडा आखला. त्यामुळेच आज नवी मुंबईत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रतीके दिसत आहेत रस्त्यावर कचरा दिसत नाही. लोकांच्या मानसिकतेत बदल होताना दिसत आहे.

आपण परदेशात गेल्यानंतर कागदात किंवा प्लास्टिकमध्ये काही खायला नेले असेल तर ते खाऊन झाल्यावर कागद गुंडाळून स्वतःच्या खिशात ठेवतो. हॉटेलवर आल्यानंतर डस्टबिनमध्ये टाकतो. तेच आपण भारतात आल्यानंतर मात्र दिसेल तिथे कचरा टाकतो. ज्या रस्त्यावर आपण कचरा टाकणार आहोत, ते रस्ते स्वच्छ असतील तर आपणही कचरा करण्यापूर्वी दोन वेळा विचार करतो. ही मानसिकता एका रात्रीतून येत नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. नवी मुंबईमध्ये २०१८ पासून या प्रयत्नांना सुरुवात झाली. चार-पाच वर्षांत या मानसिकतेने एक निश्चित दिशा धरली आहे.

नवी मुंबईला जे जमले ते मुंबईसह इतर महापालिकांना का जमत नाही? कल्याण डोंबिवलीमध्ये डॉ. विजय सूर्यवंशी आयुक्त असताना जे काम झाले ते आज होताना दिसत नाही. पनवेल महापालिकेत थोडे बहुत प्रयत्न सुरू आहेत.

अभिजित बांगर स्वतः ठाण्यात गेले आहेत. चंद्रशेखर यांच्यासारख्या अधिकाऱ्याने बाळासाहेब ठाकरे पाठीशी होते म्हणून. ठाण्यातील अनेक अतिक्रमणे भुईसपाट केली. बांगर यांच्या पाठीशी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे चेल्या-चपाट्यांना दाद न देता काम करण्याची मुभा बांगर यांना आहे. नवी मुंबईत जे केले ते ठाण्यामध्ये करून दाखवण्याची धमक त्यांच्यात आहे.

मुंबईचे काय?

१. मुंबई महापालिका श्रीमंत आणि मोठी १ महापालिका आहे. मात्र, मुंबईत सुशोभीकरणाच्या नावाखाली केवळ खडबडीत गालांना पावडर चोपडणे सुरु आहे. जी डेंटीच्या निमित्ताने मुंबईचे बकालपण पडदे आणि फ्लेक्स लावून झाकले जात आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत.

२. मुंबईचा डान्सबार करून टाकला आहे. वाटेल तशी लायटिंग ठिकठिकाणी मुंबईत केली आहे. असे म्हणत राज ठाकरे यांनी मुंबईत चालू असलेल्या कामांचे नेमके वर्णन केले आहे.

३. कुठलाही गाजावाजा किंवा बडेजाव न करता नवी मुंबईत जे झाले ते मुंबईत करण्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. दुर्दैवाने त्याचाच अभाव दिसत आहे.

४. ठिकठिकाणी पडलेले कचऱ्यांचे ढीग, वाटेल तेथे फेरीवाल्यांनी थाटलेली दुकाने, त्यातून होणारा कचरा यावर जरी- नियंत्रण ठेवण्याची इच्छाशक्ती मुंबई महापालिकेने दाखवली तरीही ५०% मुंबई स्वच्छ दिसू लागेल. तुम्हाला काय वाटते...?

Web Title: Special Article on What Navi Mumbai gets in Cleanliness why not others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.