भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीत पक्षाने व्हीप (पक्षादेश) बजावूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग ४० मधील नगरसेवक परशुराम म्हात्रे अनुपस्थित राहिले. यामुळे भाजपा उमेदवाराचा विजय झाला. या प्रकरणी अजूनही पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत तीव्र नाराजी आहे.वेळोवेळी सोयीनुसार पक्षाला बगल देत विरोधी पक्षाशी हातमिळवणी करणाऱ्यांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढली आहे. प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयाला म्हात्रे हेच जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे पदाधिकारी करत आहेत. परंतु, पक्षाकडूनही अशा बंडखोरांवर कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. प्रभाग समिती क्रमांक-६ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपा-शिवसेना-बविआचे प्रत्येकी नऊ सदस्य असल्याने येथील निवडणूक लक्षवेधी ठरली होती. दोन्ही बाजूंकडील समान मतदानामुळे सभापतींची निवड लॉटरी पद्धतीनेच होणार, असे गृहीत धरीत असतानाच म्हात्रे यांनी निवडणुकीला येणे टाळले. त्यामुळे भाजपा उमेदवार विजयी झाला. या वेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अंदाज चुकल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. गटनेते बर्नड डिमेलो यांनी पक्षादेश बजावताना म्हात्रे यांना निवडणुकीला हजर राहण्याचे आदेश आदल्या दिवशी मोबाइलद्वारे दिले. त्या वेळी म्हात्रे यांनी निवडणुकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले. मात्र, ते दुसऱ्या दिवशी गैरहजर राहिले. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई न केल्याने त्यांच्या बंडखोरीची लागण पक्षातील इतर नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना होण्याची भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
‘तो’ नगरसेवक कारवाईविना
By admin | Updated: May 15, 2016 03:49 IST