स्मार्ट सिटीला हवे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:55 AM2021-01-16T00:55:12+5:302021-01-16T00:55:25+5:30

फसवणुकीच्या तक्रारींत चिंताजनक वाढ

Smart City wants an independent cyber police station | स्मार्ट सिटीला हवे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे

स्मार्ट सिटीला हवे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे

googlenewsNext

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : मागील तीन वर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सायबर गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. २०२०मध्ये सायबर गुन्ह्याशी संबंधित ५००हून अधिक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या असून, त्यात २७८ गुन्हे दाखल आहेत. मात्र गुन्हे उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने आयुक्तालयासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची आवश्यकता भासत आहे.

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात सायबर गुन्हे हे नागरिकांसह पोलिसांना आव्हान देणारे ठरत आहेत. मागील तीन वर्षात नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. २०१८मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर गुन्ह्याशी संबंधित १२० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तर २०१९मध्ये त्यात वाढ होऊन ४१७ तक्रारी नोंद झाल्या होत्या. मात्र २०२० मध्ये सायबर सेलकडे ५००हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २७८ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात आयटीशी संबंधित २३२ गुन्हे असून, केवळ २१ गुन्ह्यांची उकल होऊ शकलेली आहे. भविष्यात सायबर गुन्हे अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाची स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची नितांत गरज भासत आहे. ते झाल्यास स्थानिक पोलीस ठाण्याऐवजी थेट सायबर पोलीस ठाण्यातच गुन्हा होऊन तपासाला गती मिळू शकते. राज्याच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये असे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहेत. परंतु स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या बाबतीतच होत असलेल्या उदासीनतेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प
n पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी गुन्हे शाखेअंतर्गत एकमेव सायबर सेल कार्यरत आहे. त्यामध्ये एक वरिष्ठ निरीक्षक, चार अधिकारी व नऊ कर्मचारी यांचा समावेश आहे. 
n घडलेल्या या गुन्ह्याची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद केली जाते. त्यानंतर सायबर सेलकडून गुन्ह्याच्या तपासासाठी आवश्यक तांत्रिक 
माहिती पुरवली जाते. 
n ही प्रक्रिया वेळखाऊ व सदोष असल्याने तसेच सायबर सेलचे अपुरे मनुष्यबळ, यामुळे बहुतांश गुन्ह्यांचा तपास मुळाशी पोहोचत नाही. परिणामी सायब गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

२०२० मधील गुन्हे
ऑनलाइन    १०९
फेसबुकद्वारे    ०४
कार्ड क्लोनिंग    १५
ओटीपी मिळवून    ५५
ओएलएक्स    ३२
एकूण    २७८

 

Web Title: Smart City wants an independent cyber police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.