नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरवासीयांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांना मानाचा मुजरा केला, त्याकरिता ३४ हून अधिक ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शेकडो शिवभक्तांनी उत्साही सहभाग घेतला होता.शिवजयंतीनिमित्ताने शनिवारी शहरात ५६ ठिकाणी छोट्या-मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याशिवाय रहिवासी सोसायट्या, सामाजिक संघटना यांनीही मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला. या दरम्यान ३४ हून अधिक आयोजकांनी शिवरायांच्या प्रतिमेच्या मिरवणुका काढल्या. लहानथोरांसह तरुणांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. त्याप्रमाणे नेरुळ सेक्टर ६ येथील जाणता राजा तरुण मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. शुक्रवारी सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता रविवारी केली जाणार आहे. या दरम्यान छत्रपतींच्या कार्याची महती सांगणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रमही राबवले जात आहेत. त्यामध्ये शिवज्योतीचे पूजन, तुळजाभवानीचा जागर, लहान मुलांसाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, कबड्डी स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष संजय शेवाळे, प्रशांत सोळसकर, अजित खताळ यांच्यासह त्यांचे सहकारी यांच्या वतीने हा तीन दिवसीय सोहळा साजरा होत आहे. तर घणसोली येथील शिवसाधना शिवआरती समूहाच्या वतीनेही सालाबादप्रमाणे यंदाही सिम्पलेक्स चौकात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. परिसरातील तरुणांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित होऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य पालखी काढली. त्याशिवाय पोवाडा, चित्रकला स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करून मान्यवरांच्या हस्ते परिसरातील सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. काही संघटनांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी केली. सीबीडी येथील आर्टिस्ट व्हिलेज परिसर, सीवूड, कोपरखैरणे, ऐरोली परिसरातही सामाजिक संघटनांसह मंडळांनी व शिवसेनेच्या वतीनेही कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
जयंतीनिमित्ताने शिवरायांना मानाचा मुजरा; ३४ हून अधिक ठिकाणी निघाल्या मिरवणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 04:29 IST