नवी मुंबई : वाशीत सापडलेल्या मानवी खोपडीचे गूढ अद्याप पोलिसांना उकललेले नाही. उद्यानात एक कुत्रा ही मानवी खोपडी घेऊन आल्याचे नागरिकांनी पाहिले होते; परंतु त्या मृतदेहाचे इतर अवशेष अथवा इतर कसलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.वाशीतील वीर सावरकर उद्यानात २० जानेवारी रोजी हा प्रकार घडला होता. त्या ठिकाणी नागरिक बसलेले असताना एक कुत्रा तोंडात मानवी खोपडी घेऊन आला होता. प्रत्यक्षदर्शींनी या प्रकाराची माहिती वाशी पोलिसांना दिली असता, पोलिसांनी ती खोपडी ताब्यात घेतली; परंतु दोन महिने उलटूनही या खोपडीचे गूढ अद्याप उकललेले नाही. ही खोपडी स्त्री किंवा पुरुषाची हेही तपासात अद्याप समोर आलेले नाही. घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधाशोध करूनही खोपडी व्यतिरिक्त इतर कोणताही मानवी अवशेष सापडलेला नाही. त्यामुळे खाडीच्या भागातून कुत्र्याने ही खोपडी आणली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. वाशी खाडीपुलावरून झालेल्या आत्महत्येच्या काही घटनांमधील मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत. त्यापैकीच एकाचा मृतदेह अनेक महिने खाडीतल्या झाडीमध्ये अथवा गाळात अडकून हाडांचा सापळा शिल्लक राहिला असावा व त्यापैकीच खोपडी कुत्र्याने ओढत बाहेर काढली असावी, असाही अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. (प्रतिनिधी)
सापडलेल्या खोपडीचे गूढ कायम
By admin | Updated: March 23, 2017 01:46 IST