उल्हासनगर : पालिका कामगार संघटनेने ३०५ हंगामी कामगार भरतीची मागणी पालिका आयुक्तांकडे लावून धरली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हा प्रश्न अधांतरी अडकण्याची भीती व्यक्त होत आहे. कामगार नेते चरणसिंग टाक यांनी न्यायालयाच्या आदेशान्वये भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली.उल्हासनगर महापालिकेत ३०५ हंगामी कामगारांचा प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून न्यायालय, कामगार संघटना व पालिकेच्या वादात लटकला आहे. या कामगारांना सेवेत घेण्याचा ठराव महासभेत मंजूर झाला आहे. भरतीच्या वेळी हंगामी कामगारांना अनुभवाचा फायदा होणार असून भरती प्रक्रिया दिवाळीपूर्वी सुरू करण्याची मागणी संघटनेने केली आहे. आयुक्त मनोहर हिरे यांनी कामगारांची सेवा ज्येष्ठता यादी मागविली असून न्यायालयाचा आदेश तपासून निर्णय घेणार आहेत. ३०५ कामगारांपैकी असंख्य कामगारांचा मृत्यू झाला, तर काहींचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. अशा कामगारांच्या मुलांचा विचार होण्याची गरज असल्याची मागणी पुढे येत आहे. कामगार नेते चरणसिंग टाक, राधाकृष्ण साठे, श्याम गायकवाड, दिलीप थोरात यांनी भरतीची मागणी लावून धरल्याने हंगामी कामगारांत उत्साह निर्माण झाला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ८०० सफाई कामगारांची संख्या कमी असल्याची माहिती त्यांनी दिली.अपुऱ्या कामगारांमुळे कचऱ्याचे ढीग साचून शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. ऐन सणासुदीच्या काळात साफसफाईचा बोजवारा उडाला.
हंगामी ३०५ कर्मचारी अधांतरी
By admin | Updated: October 1, 2015 23:36 IST