नवी मुंबई : विमानतळबाधित गावांच्या स्थलांतर प्रक्रियेला गती प्राप्त व्हावी, यासाठी सिडकोने जाहीर केलेल्या विशेष प्रोत्साहन भत्ता योजनेला प्रकल्पग्रस्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिनाभरात जवळपास ७00 कुटुंबांनी स्थलांतरण करून विशेष भत्त्याचा लाभ घेतला आहे. अधिक भत्याचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च अंतिम मुदत असल्याने उरलेल्या तीन दिवसांत प्रकल्पग्रस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.विमानतळ प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांना पुनर्वसन व पुन:स्थापन योजनेअंतर्गत पर्यायी भूखंड व इतर सुविधा देण्यात आल्या आहेत; परंतु स्थलांतराच्या प्रक्रियेला म्हणावा, तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे स्थलांतरण करणाºया ३000 कुटुंबांना सिडकोने विशेष प्रोत्साहन भत्ता योजना जाहीर केली आहे. ही योजना तीन टप्प्यात वर्गीकृत करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ मार्च २0१८पर्यंत स्थलांतरण करणाºयांना त्यांच्या एकूण निष्कासित बांधकामासाठी ५00 रुपये प्रतिचौरस फूट याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. तर दुसरा टप्पा ३0 एप्रिलपर्यंत आणि तिसरा टप्पा ३१ मेपर्यंत जाहीर करण्यात आला आहे. दुसºया व तिसºया टप्प्यातील स्थलांतरितांसाठी अनुक्रमे प्रतिचौरस फूट ३00 आणि १00 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. १ जून २0१८ रोजी ही योजना संपुष्टात येणार आहे. ही योजना २३ फेब्रुवारी २0१८पासून लागू करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात या योजनेला प्रतिसाद देत जवळपास ७00 प्रकल्पग्रस्तांनी आपली बांधकामे पाडून स्थलांतरण केले आहे. उर्वरित २३00 प्रकल्पग्रस्तांना पहिल्या वर्गातील अधिक प्रोत्साहन भत्त्याचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची संधी आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पग्रस्तांच्या सोयीसाठी २९, ३0 व ३१ मार्च या सुट्टीच्या दिवशीही प्रोत्साहन भत्त्याचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे उर्वरित दिवसांत अधिकाधिक प्रकल्पग्रस्तांकडून अर्ज प्राप्त होतील, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
सिडकोच्या विशेष प्रोत्साहन भत्ता योजनेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:55 IST