पोलादपूर : पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीमुळे नागरिकांना निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागू नये, यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. पूरग्रस्त गावातील नागरिकांना बचावासाठी शोध बचाव पथके तालुकास्तरावर स्थापन केली असून, त्या संदर्भात नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षासह संबंधित विभागांना, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आल्या आहेत.तालुक्यात समिती स्थापन करून यंत्रसामग्री व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पूर, दरड कोसळणे, चक्रीवादळ, साथीचे रोग, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकतात. यंदा हवामान विभागाने वेळेवर आणि चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. आपत्ती व्यवस्थापन यासंदर्भात पोलादपूर तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट असलेल्या संभाव्य गावांकरिता बचावाकरिता नियोजन करण्यात आले असून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. यामध्ये पुराचा धोका असल्याची माहिती देण्यात आली.मान्सूनपूर्व तयारीच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनेसंबंधी सर्व संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. २०१६ या वर्षाचा अद्ययावत तालुक्यांचा तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष १ जून ते १५ आॅक्टोबरपर्यंत २४ तास कार्यरत असून, आपत्तीविषयक संदेश घेण्याकरिता विविध विभागातून १0८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. नैसर्गिक आपत्ती उद््भवल्यास तातडीने माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तहसील कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, संदेश घेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रात्रपाळी, दिवसपाळी अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी पुरामुळे पिकांची, पशुधनाची हानी होते, याबाबत कृषी अधिकारी यांनी नियोजन करून योग्य ती कार्यवाही करावी, तसेच मान्सूनकाळात दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे बाधितांना तात्पुरता अन्नधान्य, रॉकेलचा पुरवठा करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत पुरवठा अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करावी. सातत्याने खंडित होणारी दूरध्वनी व वीजवितरण सेवा नीट ठेवण्याबाबत महावितरण व बीएसएनएलला सूचना दिलेल्या आहेत.सावित्री नदीला अतिवृष्टी झाल्यावर पूर येतो तसेच बाजीरे धरणातून पाणी सोडल्यास ही पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असते. याबाबत धरणावरील अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षाला वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. २००९ मध्ये चार गावे पुरामुळे प्रभावित झाली होती. पाण्याचा धोका असलेली संभाव्य गावे पोलादपूर, चरई, सवाद या नदीकिनारी असलेल्या गावांना पाण्यापासून धोका संभवतो याकरिता पोहणारे युवकाचे पथक बनवण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी प्रशासन नियोजन करते. मात्र, प्रत्येकवेळी या नियोजनाचे तीनतेरा वाजलेले दिसतात. काही वेळा तर अपुऱ्या सामग्रीमुळे या नियोजनाचा पुरता फज्जा उडतो. दरवर्षी नालेसफाईचे काम युध्दस्तरावर पावसाळा सुरू होण्यापूर्वी होत असले तरी कागदोपत्री झालेल्या या कामाचा फटका अनेक गावांना बसतो.
आपत्ती निवारणासाठी बचाव पथक
By admin | Updated: June 20, 2016 02:24 IST