नवी मुंबई : शहरातील मुस्लीम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात रमजान ईद साजरी केली. हिंदू आणि मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. यानिमित्त शहरात ठिकठिकाणी सामाजिक तसेच सांस्कृतिक अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने गुरुवारी नवी मुंबईसह उरण, पनवेल परिसरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली.वाशीतील नूर मजीद येथे मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपायुक्त प्रशांत खैरे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप माने, वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, माजी नगरसेवक वैभव गायकवाड आदींनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील इतर मशिदीतही नमाजाचा कार्यक्रम झाला. यानंतर मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधवांचीही उपस्थिती होती. मुस्लीम बांधवांना फुले देऊन आणि गळा भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या होत्या. सुका मेवा, कपडे, फळे खरेदीसाठी मुस्लीम बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
शहरात रमजान ईदचा जल्लोष
By admin | Updated: July 8, 2016 03:30 IST