पंकज रोडेकर, ठाणेअपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कितीही उपाय केले, तरीही अपघातांची संख्या थांबत नसल्याचे दिसते. मागील साडेतीन वर्षांत ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत झालेल्या प्राणांकित अपघातांत १,२०९ जणांना आपले प्राण गमावावे लागले असून १ हजार ११९ जण जखमी झाले आहेत. तर, २०१३ या वर्षी मयत ३३३ होते. तो आकडा २०१५ मध्ये ३५७ वर तर २०१६ या वर्षातील जानेवारी ते जूनदरम्यान, १७१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. याचदरम्यान मृत बेवारसांची ओळख पटण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन ठाणे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकात बॅनरचा आधार घेतला आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कोपरी पुलापासून दिवा रेल्वे स्थानक ते दिव्यापासून निळजेपर्यंत आहे. ऐतिहासिक रेल्वे स्थानक असलेल्या ठाण्यातून रेल्वेतून दररोज ६ लाख प्रवासी ये-जा करतात. तसेच सकाळी आणि सायंकाळी अक्षरश: असणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी लोकलला लटकून ये-जा करतात. त्यामुळे लोकलमधून पडण्याचे प्रमाण तसेच घाईगडबडीत रूळ ओलांडताना अपघात वाढले आहेत. ते रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या तरीसुद्धा गेल्या साडेतीन वर्षांत १ हजार २०९ जणांचा रेल्वे अपघातांत मृत्यू झाला असून १ हजार ११९ जखमी झाले. या अपघाती मृत्यू झालेल्यांमध्ये २५ ते ५० वयोगटांतील लोकांचा समावेश आहे. तसेच अपघातांत पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रेल्वे अपघात वाढताहेत
By admin | Updated: July 25, 2016 02:57 IST