वैभव गायकर।लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : शहरातील पळस्पे फाटा परिसरात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूलव्हॅनला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. या घटनेत संपूर्ण व्हॅन जळून खाक झाली. चालकाच्या सतर्कतेमुळे व्हॅनमधील दोन विद्यार्थिनींना वेळीच खाली उतरवण्यात आल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितरीत्या व्हावी, याकरिता शासन आदेशानुसार, प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. पनवेल परिसरात अनेक खासगी, अनुदानित शाळा असून विद्यार्थीसंख्या जवळपास एक लाख ६५ हजार इतकी आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना झाली आहे की नाही, याबाबत साशंकता आहे.
दहा वर्षांपूर्वी २० आॅगस्ट २००९ मध्येही एका शाळेच्या बसला आग लागल्याची घटना घडली होती. या अपघातात १५ विद्यार्थी गंभीररीत्या भाजले होते, तर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरच राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता.पनवेल तालुक्यात एकूण ४३५ स्कूलव्हॅन तसेच ११५ च्या आसपास शाळेच्या बस कार्यान्वित आहेत. यातून दररोज हजारो विद्यार्थी प्रवास करतात. त्यामुळे या वाहनांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. प्रादेशिक परिवहन विभागामार्फत या वाहनांची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. त्याच धर्तीवर प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने सुरक्षित आहेत की नाहीत? विद्यार्थ्यांना उद्भवणाºया समस्यांवर समितीद्वारे तोडगा काढलाजातो.
समितीवर एक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक वाहतूक पोलीस अधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक तसेच पालकांच्या प्रतिनिधीचा समावेश असतो. मात्र, अनेक शाळांमध्ये ही समिती केवळ कागदावरच असल्याचे समोर आले आहे. एखादी दुर्घटना घडल्यास, परिवहन विभाग, वाहनचालकांना जबाबदार धरले जाते. मात्र, अशा घटना टाळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत शाळा प्रशासन तसेच पालकांची उदासीनता दिसून येत आहे.शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. शाळा प्रशासनासह पालकांनीही आपली जबाबदारी लक्षात घेतल्यास अशा घटना टाळता येणे शक्य आहे. मंगळवारच्या घटनेनंतर पनवेल प्रादेशिक परिवहन विभाग सतर्क झाला आहे.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांची नियमित तपासणी केली जाते. नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. मात्र, शासनाच्या आदेशाने स्थापन केलेल्या परिवहन समित्यांच्या मार्फतही नियमित बैठका घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन व पालकांनीही आपली जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे.- हेमांगिनी पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल