नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांच्या स्थलांतर प्रक्रियेने गती घेतली आहे. पुनर्वसन क्षेत्राच्या काही भागात पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांना या ठिकाणी आता बांधकाम प्रक्रिया सुरू करता येणार आहे. सध्या वडघरमधील पॉकेट क्रमांक १ व २ मधील विकासकामे पूर्ण झाली आहेत.विमानतळ प्रकल्पासाठी चिंचपाडा, कोपर, कोल्ही, उलवे, वरचे ओवळे, वाघिवली वाडा, वाघिवली, गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे या १० गावांचे स्थलांतर केले जाणार आहे. येथील लाभधारकांचे वडघर, वहाळ व कुंडे वहाळ येथे पुनर्वसन केले जाणार आहे. वडघरमधील पॉकेट क्रमांक १ व २ मध्ये कोल्ही, कोपर, वाघिवली वाडा व वडघर या गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या पॉकेटमध्ये एकूण ८४४ भूखंड असून त्यांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. या विकसित भूखंडांचा ताबा देण्याची कार्यवाहीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. पॉकेट क्रमांक १ व २ मधील ८४४ भूखंडापैकी कोल्ही १८२, कोपर १९५, वडघर ३८४, वाघिवली वाडा ८३ भूखंड संबंधित लाभार्थींना वाटपासाठी तयार आहेत. पुनर्वसन व पुन:स्थापन परिसरातील लाभार्थ्यांच्या यादीनुसार भूखंडासाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीमध्ये लाभार्थ्यांच्या भूखंडाचे क्रमांक निश्चित करण्यात आले होते. भूखंडाची विकासकामे पूर्ण झाली असून सदर भूखंड बांधकामासाठी तयार असल्याचे पत्र संबंधित लाभार्थ्यांना पाठवण्यात येत आहे. वडघर पॉके ट क्रमांक ३, वहाळ पॉकेट ४, ५ व ६ आणि कुंडेवहाळ पॉकेट क्रमांक ७ मधील भूखंडाचे विकासकाम प्रगतिपथावर आहे.
विमानतळ पुनर्वसन क्षेत्र बांधकामास तयार
By admin | Updated: March 22, 2017 01:41 IST