नामदेव मोरे, नवी मुंबईमहानगरपालिकेने खाजगी संस्थेच्या सहकार्याने मिस नवी मुंबई स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे सौंदर्य स्पर्धेला प्राधान्य देणाऱ्या पालिकेला मराठी भाषा दिनाचा विसर पडला आहे. राजभाषा दिनानिमित्त एकाही कार्यक्रमाचे आयोजन न केल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेले मराठी नागरिक यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. मराठी भाषेचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी व्याख्यान, पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन केले जाते. राज्य शासनाने राजभाषा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मराठी भाषिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेला मात्र मराठीचा विसर पडला आहे. मराठी भाषा दिनाच्या दोन दिवस अगोदर पालिकेने खाजगी इव्हेंट कंपनीच्या सहकार्याने मिस नवी मुंबई स्पर्धेचे आयोजन केले. नवी मुुंबई हे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या नागरिकांना एकात्म भावनेने सामावून घेणारे शहर आहे. शहराला सांस्कृतिक वलय निर्माण करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिका करत असते. याचाच भाग म्हणून यावर्षी सौंदर्य स्पर्धा आयोजित केली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सौंदर्य स्पर्धेमुळे सांस्कृतिक वैभव वाढते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवी मुंबईमध्ये फक्त युवतींसाठीच नाही तर विवाहिता, दांपत्य, ज्येष्ठ नागरिक व मुलांसाठीही सौंदर्य स्पर्धा आयोजित करावी असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. सौंदर्य स्पर्धेच्या आयोजनामध्ये मग्न असणाऱ्या पालिका प्रशासनाला २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिन असल्याचे लक्षातच राहिले नाही. शहरात यानिमित्ताने एकही कार्यक्रम आयोजित केला नाही. विशेष म्हणजे महापालिकेच्या स्थापनेपासून मनपाने अशाप्रकारे एकही कार्यक्रम राबविलेला नाही. नवी मुंबईच्या शेजारी असणाऱ्या कल्याणमध्ये महापालिका व सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला एक व्याख्यान होत आहे. परंतु स्मार्ट सिटीमध्ये सहभागी होण्याची घाई झालेल्या पालिकेने एकही कार्यक्रम न घेतल्यामुळे भाषाप्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने कला, क्रीडा व संस्कृतीचे जतन करणाऱ्या कार्यक्रमांचेच आयोजन करावे. सौंदर्य स्पर्धेपेक्षा भाषा संवर्धनास प्रथम प्राधान्य द्यावे असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
मराठी भाषेपेक्षा सौंदर्य स्पर्धेला प्राधान्य
By admin | Updated: March 1, 2016 02:50 IST