शहरात पोलिसांना ना ड्युटीची वेळ, ना पगाराचा मेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 03:02 AM2021-02-08T03:02:10+5:302021-02-08T03:02:19+5:30

पदरी निराशाच; संसाराचा गाडा हाकण्याची चिंता, घर मिळालेलेही अडचणींमुळे त्रस्त

Police in the city have no duty time, no salary match! | शहरात पोलिसांना ना ड्युटीची वेळ, ना पगाराचा मेळ!

शहरात पोलिसांना ना ड्युटीची वेळ, ना पगाराचा मेळ!

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : शासकीय नोकरी असूनही पदरी निराशा अशी अवस्था पोलिसांच्या कुटुंबीयांची झाली आहे. कामाची कसलीही वेळ निश्चित नसल्याने कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसल्याची मोठी खंत आहे, तर अनेकांपुढे संसाराचा गाडा हाकायचा तरी कसा, याचीही चिंता आहे.
शासकीय नोकरीच्या हव्यासापोटी पोलीस दलात भरती झालेल्या अनेकांची काही वर्षांतच नोकरी नको अशी अवस्था झाली आहे. त्याला कामाची अनिश्चित वेळ व राहायची सोय नसणे ही मुख्य कारणे ठरत आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ४ हजार ८०४ अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यापैकी ४६५ जणांना शासकीय घरात राहण्याची संधी मिळाली आहे. उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिकांपुढे हक्काच्या घराचा प्रश्न कायम आहे. पूर्वीपासून नवी मुंबईत स्थायिक असलेल्या बहुतेक जणांचे स्वतःचे घर आहे. मात्र, भरती झाल्यानंतर नवी मुंबईत स्थायिक झालेल्यांना भाड्याच्या घराचा आसरा घ्यावा लागत आहे, तर स्वतःचे हक्काचे घर नसल्याने ते होईपर्यंत नव्याने भरती झालेल्यांपैकी अनेकांनी अद्याप हात पिवळे केलेले नाहीत. ज्यांना पोलीस कॉलनीत घर मिळाले आहे, ते तिथल्या समस्यांनी त्रस्त आहेत. जे कर्तव्य बजावत संसाराचा गाडा हाकत आहेत, त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ड्युटीवर हजर झाल्यानंतर परत घरी जाण्याची वेळ निश्चित नसल्याने कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. यामुळे मुलांच्या संगोपनाकडे काहीसे दुर्लक्ष होते, तर काम संपवून घरी गेल्यानंतर दिवसभरातल्या कामाचा ताण व तपासाचा वैचारिक भाग घरी सोबतच घेऊन जावा लागतो. या वाढत्या ताणामुळे अनेक जण नशेच्या आहारी जात आहेत. यातूनच काही अंशी पोलिसांची प्रतिमा मलीन होण्याचे प्रकार घडत आहेत.

ड्युटी किती तासांची?
आठ तासांची ड्युटी कागदावरच असल्याने, ठाण्यातले कामकाज व तपास, यामुळे सर्वाधिक वेळ कर्तव्यावरच जात आहे.

कुटुंबासाठी पुरेसा वेळ नाही
कामाचीच वेळ निश्चित नसल्याने अधिकारी किंवा कर्मचारी यांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नाही.

मुलांचे शिक्षण कसे करणार?
ठरावीक अधिकारी वगळता बहुतांश कर्मचाऱ्यांची मुले ही मध्यम दर्जाच्या खासगी शाळांमध्ये शिकत आहेत.

ज्या नोकरीमुळे कुटुंबीयांनी सोयरीक जुळविली, तीच नोकरी कौटुंबिक सुखाच्या आड येऊ लागली आहे. पतीची कामाची वेळ निश्चित नाही. त्यामुळे घरच्या बाबींकडे, शिवाय मुलांच्या गरजांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, तर कामाच्या वाढत्या ताणाचा परिणाम पतीच्या प्रकृतीवर होतो आहे.
- रेखा जाधव, पोलीस पत्नी (बदललेले नाव)

Web Title: Police in the city have no duty time, no salary match!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.