नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कन्टेनमेंट झोनमध्ये २८ फेबुवारीपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. असे असले तरी मनपा हद्दीत रात्री १ वाजेपर्यंत उपाहारगृहे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून, इतर दुकानांनाही ११ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. क्रीडा स्पर्धांनाही परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्च २०२० पासून नवी मुंबईमध्येही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याला व वेळोवेळी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. आयुक्त अभिजित बांगर यांनी ११ फेब्रुवारीला सुधारित आदेश काढून संपूर्ण महिनाभर कुठे व कसा लाॅकडाऊन राहणार हे स्पष्ट केले आहे. राज्य शासनाकडील प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि विविध खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यासही परवानगी दिली आहे. यामध्ये राज्यभर सुरू असलेल्या क्रीडा अकादमी यांचाही समावेश असणार आहे. राज्यातील यशदा, वनामती, मित्रा, मेरी व इतर शासकीय संस्थांना कन्टेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी ऑफलाइन प्रशिक्षण देण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. शहरातील उपाहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. व्यापारी संघटनांनी दुकानांनाही ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मागितली होती. त्या मागणीची दखल घेऊन परवानगी देण्यात आली आहे. पण, दुकाने व आस्थापनांना ३० टक्के कर्मचारी यांची अट कायम ठेवली.नियमांचे पालन करावेमहानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर साथरोग अधिनियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व इतर नियमांचेही पालन करण्याचे आवाहन केले आहे.
उपाहारगृहे १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:51 IST