- वैभव गायकर, पनवेलपनवेल न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या वास्तूचा ताबा न्यायालयाला देण्यात आला आहे. परंतु याठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे आणि याच कारणास्तव न्यायालयाचे उद्घाटन रखडल्याचे बोलले जात आहे. शहराच्या एका बाजूला, बंदराच्या कडेला पनवेल न्यायालयाची जुनी इमारत आहे. अतिशय जुनी असलेली ही वास्तू दगडात बांधलेली असून वाढत्या कारभारामुळे अपुरी पडत आहे. जुन्या वास्तूच्या छताला गळती लागली असून आजूबाजूला झाडेझुडपे वाढली आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात कागदपत्रे भिजण्याचे प्रकार घडलेले आहेत. २६ जुलै २००५ रोजी ही इमारत पाण्याखाली गेल्याने महत्त्वाच्या फाईल्स व कागदपत्रे भिजली होती. जुनी इमारत, अपुरी जागा, पायाभूत सुविधांचा अभाव, बस स्थानकापासून दूर असल्याच्या पार्श्वभूमीवर नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. शासन स्तरावर मंजुरी मिळाल्यावर लोखंडी पाडा परिसरात अंतिम भूखंड क्रमांक ९०, ९१, ९२ या ठिकाणी ७७७५.५० चौ. मी. जागेवर इमारत उभारण्यात आली आहे. याकरिता ७ कोटी २२ लाख रुपये खर्च करण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. तळमजल्यावर १७१९.८७ चौरस मीटर क्षेत्रावर चार कोर्टरूम बांधण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर १६२०.८३ चौ.मी. जागेत आणखी चार कोर्ट रूमची व्यवस्था आहे. आठ स्वच्छतागृहे, न्यायालयीन कार्यालय, साक्षीदार कक्ष, कॅण्टीन, व्हिडिओ कॉन्फरन्स, स्त्रिया व पुरुष आरोपींसाठी कोठडी, गार्डरूम, रेकॉर्ड रूम, संगणक, मुद्देमाल, चौकशी, बेलीयन्स कक्ष, सुविधा केंद्र, स्टोअर रूम, स्टेशनरी, जनतेसाठी प्रतीक्षा कक्ष, लोकअदालत न्यायालय, न्यायदंडाधिकारी वाचनालय, दोन बार रूम, अधीक्षक कार्यालय त्याचबरोबर अभ्यासिका आदींचा यात समावेश आहे. न्यायालयाचा आराखडा, प्रशासकीय, तांत्रिक मंजुरी, निधीची तरतूद, निविदा अशा अनेक गोष्टींमुळे इमारतीच्या बांधकामास विलंब झाला. त्यानंतर अंतर्गत सजावटीमुळे काही काळ इमारतीचे उद्घाटन रखडले होते. हे काम १४ आॅक्टोबरला पूर्ण झाल्यावर न्यायालयाची इमारत विधी व न्याय विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या जागेची मागणी न्यायालयाच्या बाजूलाच तालुका पोलीस ठाणे आहे. याठिकाणीच जागा पार्किंगकरिता मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत संयुक्त बैठक सुध्दा झाली. मात्र पोलीस ठाण्याच्या जागेत निवासी संकुल बांधण्यात येणार आहे. त्यानंतर काही जागा शिल्लक राहिल्यास पार्किंगसाठी घेण्यास हरकत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. वन-वे करा न्यायालयापासून जाणारे सगळे रस्ते अरुंद आहेत. त्या ठिकाणी वन-वे करावा, अशी मागणी पनवेल तालुका बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, असे मत असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.४० वाहनांसाठीच पार्किंग नवीन इमारतीत अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पनवेल न्यायालयसुध्दा या ठिकाणी स्थलांतरित होणार आहे. यामुळे दररोज शेकडो वाहने येथे येण्याची शक्यता आहे. मात्र न्यायालय परिसरात केवळ ४० दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असल्याने उर्वरित वाहने कुठे उभी करायची हा प्रश्न आहे.
न्यायालयात पार्किंगची समस्या
By admin | Updated: October 22, 2016 03:22 IST