मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या राजेंद्र पडते यांच्या मालकीच्या नीलकमल बोटीला बुधवारी अपघात झाला. या अपघातात निष्पाप दोन मुले आणि इतर १२ जण अशा १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ११ मृतदेहांच्या शवविच्छेदनासाठी सलग ११ तास लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
नीलकमल बोट अपघात मृत्यू झालेल्या ११ मृतांचे मृतदेह बुधवारी रात्री उरण येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल झालेल्या ११ मृतदेहांचा खच पडल्याने कर्मचारीवर्गही अगदी भांबावून गेला होता. मात्र, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाळासो काळेल आणि त्यांचे सहकारी डॉ. प्रकाश हिमगिरे यांनी सर्व सोपस्कार पार पाडून शवविच्छेदनाच्या कामाला १ वाजता सुरुवात केली. गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सलग ११ तास शवविच्छेदनाचे काम सुरू होते. शवविच्छेदनाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येत होते.
नवी मुंबई सागरी सुरक्षा शाखेकडे गस्ती बोटींची वानवा
नवी मुंबई सागरी सुरक्षा शाखेकडे गस्तीसाठी बोटी कमी असल्याने बुधवारी पोलिसांना पोहोचण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. घटनास्थळी पोहोचण्यासाठी वेळेवर एकही बोट उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे सागरी पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. मात्र, असे काहीच घडले नसल्याचा दावा एसीपी अशोक राजपूत यांनी केला आहे.
देवदूत बनले विदेशी दोन पर्यटक
अपघात घडला त्या बोटीत महिला ॲलेक्सझाड्रीला गॅब्रीला ओरोस्को (साउथ आफ्रिका) आणि हॅनरिक गोवोलिक हे जर्मनीचे दोन पर्यटक प्रवास करत होते. हे दोघेही पट्टीचे पोहणारे होते. मृत्यूच्या दाढेत असतानाही आपले लाइफ जॅकेट बुडणाऱ्या देऊन या दोघांनी मृत्यूच्या दाढेतून १९ जणांना वाचवल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी दिली.
मृतांत देशभरातील पर्यटकांचा समावेश
मृतदेह ताब्यात घेताना नातेवाइकांचे हुंदके, अश्रू, आक्रोश आणि वेदना अनावर होताना दिसत होत्या. नाशिक, नेव्हल करंजा-उरण, धुळे बदलापूर -ठाणे, बिहार, उत्तर प्रदेश, नवी मुंबई, गोवा, आंध्र प्रदेश येथील शेवटचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देऊन रवाना केले. त्यानंतरच कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असल्याचे माहिती वैद्यकीय अधीक्षक बाळासाो काळेल यांनी दिली.
गुरुवारी सोडल्या २० बोटी
बुधवारच्या अपघाताच्या घटनेनंतर २० बोटी पर्यटकांना घेऊन घारापुरी बेटावर रवाना झाल्या. बुडालेली नीलकमल बोट टोल करून किनाऱ्यावर आणण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती गेटवे एलिफंटा जलवाहतूक संस्थेचे इक्बाल मुकादम यांनी दिली.
उपचारांनंतर बचावलेले ५६ जण बसने गेले घरी
मुंबई बोट दुर्घटनेत बचावलेल्या ५६ जणांना जेएनपीटी रुग्णालयात उपचार दिल्यानंतर त्यांना बसने मुंबईला पाठवण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईच्या सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यात सहभाग घेतला होता. दुर्घटनाग्रस्त बोटीतून बाहेर काढलेल्या ५७ जणांना जेएनपीटीच्या रुग्णालयात दाखल केले होते. मुंबईच्या समुद्रात बुधवारी घडलेल्या बोट दुर्घटनेवेळी नवी मुंबई पोलिस दलाच्या सागरी पोलिसांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली होती.
अन्नपाण्याची व्यवस्था
दुर्घटनास्थळापासून मुंबईपेक्षा नवी मुंबईचा सागरी किनारा जवळ होता. त्यामुळे बुडालेल्या बोटीतून बाहेर काढलेल्या ५७ जणांना तातडीने बोटीने जेएनपीटीच्या रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी एका लहान मुलाचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर उर्वरित ५६ जणांवर उपचार करून त्यांची अन्नपाण्याची व्यवस्था पोलिसांमार्फत करून देण्यात आली. यानंतर त्यांना मानसिक आधार देत, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगताच सर्वांना बसने मुंबईला पाठवल्याचे सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितले.
स्वतःसाठी काढलेला वेळच बेतला जीवावर
नोकरीच्या शोधात मुंबईला गेली असता, स्वतःसाठी थोडा वेळ काढून एलिफंटाला चाललेल्या महिलेचाही बोट दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. प्रज्ञा कांबळे (३९) असे महिलेचे नाव असून, ती नेरूळमध्ये राहत होती.
पतीपासून विभक्त असल्याने कुटुंबाने तिला आसरा दिला. मात्र, कुटुंबावर अवलंबून न राहता तिला मुलगा आणि मुलगी यांचा भार स्वतःच उचलायचा असल्याने ती नोकरीच्या शोधात होती. यासाठी बुधवारी ती मुंबईला गेली होती. तिथले काम झाल्यानंतर दुपारी ती बोटीने एलिफंटा फिरायला जात होती. त्याचवेळी बोट दुर्घटनेत बुडून तिचा मृत्यू झाला. गुरुवारी तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्यावर नेरुळ येथे अंतिम संस्कार करण्यात आले.