वैभव गायकर
पनवेल : वसुधैव कुटुंबकमचा संदेश देण्यासाठी जगभ्रमंतीवर आपल्या दुचाकीने निघालेल्या नवी मुंबईमधील योगेश आळेकरी यांची दुचाकी यूकेतील नॉटिंगहॅम शहरातून त्यांच्या प्रवासाला ब्रेक लागला आहे. याबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करून मला न्याय मिळवून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
योगेशने १ मे रोजी सुरू केलेल्या प्रवासादरम्यान १७ देशांत दुचाकीवर भ्रमण केले. या प्रवासादरम्यान त्याचे अनेक वेळा जंगलातदेखील वास्तव्यास होते. मात्र, नॉटिंगहॅमसारख्या शहरातील पे अँड पार्कमधून दिवसाढवळ्या दुचाकीसह पासपोर्ट, मॅक बुक, ३६० डिग्री कॅमेरा, कॅम्पिंगचे सामान, कपडे, रोख रक्कम, व्हिसा, महत्त्वाचे कार्ड, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाही चोरीला गेली आहे. विशेष म्हणजे २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तीन चोरटे दुचाकी चोरताना स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तरीदेखील नॉटिंगहॅम पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लावता आलेला नाही. या प्रकरणामुळे योगेश सध्या तणावाखाली असून, त्याने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.
नव्या पासपोर्टसाठी अर्जयोगेश आळेकरी याने यूकेमधील भारतीय दूतावासात नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. पुढील काही दिवसांत त्यांना नवीन पासपोर्ट मिळेल. मात्र, दुचाकी आणि इतर मौल्यवान सामान मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पुढील देशांच्या प्रवासाला ब्रेक लागला आहे.
सोशल मीडियावर निषेध योगेश प्रत्येक देशातील भ्रमंतीचे वर्णन सोशल मीडियावर मांडत असल्याने त्यांना फॉलो करणारा मोठा वर्ग देश- विदेशात आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला जात आहे.