महापालिकेचे तलाव व्हिजन फसले; कोट्यवधींचा खर्च पाण्यात,  देखभालीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 03:24 AM2018-07-02T03:24:11+5:302018-07-02T03:24:17+5:30

महापालिकेने तलाव व्हिजन मोहीम अंतर्गत तलावांच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत; परंतु नियमित देखरेख न केली गेल्याने तलावांची दयनीय अवस्था झाली आहे.

Municipal Plant Vision Crops; Lack of billions of water, lack of maintenance | महापालिकेचे तलाव व्हिजन फसले; कोट्यवधींचा खर्च पाण्यात,  देखभालीचा अभाव

महापालिकेचे तलाव व्हिजन फसले; कोट्यवधींचा खर्च पाण्यात,  देखभालीचा अभाव

Next

- अनंत पाटील

नवी मुंबई : महापालिकेने तलाव व्हिजन मोहीम अंतर्गत तलावांच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत; परंतु नियमित देखरेख न केली गेल्याने तलावांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक तलावांच्या सभोवताली अतिक्रमण झाले आहे, तर काही ठिकाणच्या तलावाला धोबीघाटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तलावाच्या काठावर सर्रासपणे वाहने धुतली जातात. घणसोली, वाशी, रबाळे, जुहूगाव आणि ऐरोली गावातील तलाव परिसरात हे चित्र प्रकर्षाने दिसून येते. एकूणच महापालिकेच्या तलाव व्हिजन मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे.
शहरातील तलाव परिसरात होणाऱ्या अपघातांना आळा घालण्याबरोबरच तलावात निर्माल्य टाकले जाऊ नये, यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्याचा प्रस्ताव मध्यंतरी लोकप्रतिनिधींनी मांडला होता. परंतु हा प्रस्ताव कागदावरच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरातील बहुतांशी तलावांची दुरवस्था झाली आहे. तलावात आणि परिसरात कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहेत. समाजकंटकांचा वावर वाढला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे तलावात पावसाचे पाणी साचून हे पाणी गावांत घुसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठोस उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.
घणसोली विभागात गोठीवली गावच्या खदाण तलावाची पार दयनीय अवस्था झाली आहे. या विसर्जन तलावाजवळ असलेली निर्माल्यकुंडी कचºयाने भरून ओसंडत आहे. तलावाच्या प्रवेशद्वारासमोरच नवीन गटारे बांधण्याचे काम सुरू आहे. येथे सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी पालिकेने फलक लावलेला नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. या तलावात नोसिल नाका झोपडपट्टी परिसरातील महिला घरातील केरकचरा आणून टाकतात. तसेच कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी या तलावाचा वापर केला जात आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची दुर्गंधी येत आहे. संरक्षण भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. विद्युत खांब आहेत; पण त्यावरील दिवे गायब आहेत. तलावाचा आतील परिसर शेवाळ आणि झाडाझुडपांनी वेढला असून त्यात अनेक जातीच्या विषारी आणि बिनविषारी सापांचा वावर आहे. इतकेच नव्हे तर या महापालिकेच्या तलावात मासेमारीसाठी जाळे लावण्यात आलेले आहेत. या तलावाच्या सभोवताली अनेक झाडे, तसेच पानफुटी वनस्पती वाढल्या आहेत.

अतिक्र मणाचा विळखा
घणसोली येथील महापालिकेच्या गुणाले तलावात दर रविवारी कार, दुचाकी टेम्पो, वाहने धुतली जातात. त्यामुळे रसायने, ज्वालाग्राही पदार्थ आणि इंधन तलावात मिसळून पाणी दूषित होत आहे. या तलावात ग्रामस्थांनी मासे सोडले होते.
ते दूषित पाण्यामुळे मृत पावत आहेत. या तलावाजवळ तुळसी टॉवरजवळ वाहनांचे गॅरेज आहेत. ते हटवल्यास येथे वाहने धुण्याचे प्रकार कमी होतील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तलावाच्या मध्यभागी एक विहीर आहे. महापालिकेची स्थापना झाल्यापासून त्या विहिरीची एकदाच साफसफाई झाली आहे.
घणसोली रेल्वे पादचारी भुयारी मार्गाजवळ अनधिकृत बांधकामांमुळे सावळी तलावाला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या तलावाच्या सभोवताली अनेक अनधिकृत बांधकामांनी विळखा घातल्यामुळे महापालिकेचा सावळी तलाव आहे तरी कुठे, असा प्रश्न घणसोलीकरांना पडलेला आहे.

दुर्गंधीचा त्रास
जुहूगाव येथील माजी महापौरांच्या बंगल्यासमोर असलेल्या तलावांची पार दुरवस्था झाली आहे. दूषित पाण्यामुळे अनेकदा मासे मरण्याचे प्रकार घडले आहेत, तर ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे येथील तलावाचीही दुरवस्था झाली आहे.
वाशी सेक्टर ७ येथील काँग्रेस भवनलगत असलेल्या तलावाची पालिकेच्या दुर्लक्षपणामुळे दुर्दशा झाली आहे. ऐरोली गावालगत शिवसेना शाखेलगत असलेल्या तलावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Municipal Plant Vision Crops; Lack of billions of water, lack of maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.