नवी मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या लाटेत जास्तीत जास्त रुग्ण संख्या २५ हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या लाटेशी मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. शहरात १२ हजार बेड उपलब्ध केले जाणार आहेत. ऑक्सिजन बेडची संख्या ५ हजारपर्यंत व आयसीयू युनिटची क्षमता १५०० पर्यंत वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. १४ एप्रिलला सक्रिय रुग्णांची संख्या ११६०५ पर्यंत पोहचली होती. तेव्हापासून सातत्याने रुग्ण संख्या कमी हाेत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही लाट आलीच तर पुन्हा आरोग्य यंत्रणा कोलमडू नये यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.
तीन ऑक्सिजन प्रकल्प उभारणारमहानगरपालिकेने वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मे अखेरपर्यंत तो प्रकल्प सुरू होईल. या व्यतिरिक्त आणखी दोन प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठीची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार आहे.