कुटुंबनियोजनाची पुरुषांना भीती; चार वर्षांत केवळ ३३ शस्त्रक्रिया, महिलांच्या मात्र ८,४७६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:46 AM2021-02-10T00:46:15+5:302021-02-10T00:46:35+5:30

जनजागृतीची गरज : अनेक गैरसमज असल्याने पुरुषांमध्ये उदासीनतेमुळे संख्या कमी

Men's fear of family planning; Only 33 surgeries in four years, only 8,476 for women | कुटुंबनियोजनाची पुरुषांना भीती; चार वर्षांत केवळ ३३ शस्त्रक्रिया, महिलांच्या मात्र ८,४७६

कुटुंबनियोजनाची पुरुषांना भीती; चार वर्षांत केवळ ३३ शस्त्रक्रिया, महिलांच्या मात्र ८,४७६

Next

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : नसबंदी केल्याने अशक्तपणा येतो तसेच पुरुषत्वावर परिणाम होतो अशा प्रकारचे विविध गैरसमज समाजात पसरलेले आहेत. गैरसमज आणि भीतीमुळे कुटुंबनियोजन शस्रक्रियेसाठी पुरुषांचे प्रमाण कमी असून, कुटुंब नियोजनाची जबाबदारी आजही महिलांवरच आहे. नवी मुंबई शहरात गेल्या चार वर्षात केवळ ३३ पुरुषांनी, तर ८४७६ महिलांनी कुटुंबनियोजनाची शस्रक्रिया केली आहे. त्यामुळे शस्रक्रियेबाबत केली जाणारी जनजागृती आणखी तीव्र व्हायला हवी, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

कुटुंबनियोजनसाठी शासनामार्फत मोहीम राबविली जाते. नागरिकांना याबाबत माहिती व्हावी यासाठी जनजागृती केली जात असून, शासनातर्फे शस्रक्रिया करणाऱ्यांना अनुदान  देण्यात येते. शस्रक्रियेबद्दल अनेक गैरसमज असल्याने कुटुंबनियोजन शस्रक्रिया फक्त स्रियांनीच करावी, असा समज असून, नवी मुंबई शहरात पुरुष नसबंदीचे प्रमाण आजही नगण्यच आहे. नवी मुंबई शहरात २०१७-१८ या वर्षात दोन हजार ६९९ महिलांनी, तर १० पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. २०१८-१९ या वर्षात दोन हजार ७५५ महिलांनी, तर १५ पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. २०१९-२० या वर्षात दोन हजार ५४८ महिलांनी, तर केवळ सहा पुरुषांनी शस्रक्रिया करून घेतली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून लॉकडाऊन होता. त्यामुळे रुग्णालयातील इतर कामांवर त्याचा परिणाम झाला होता. २०२०-२१ या वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत ४७४ महिलांनी तर फक्त दोन पुरुषांनी कुटुंबनियोजनाची शस्रक्रिया केली.

हे आहेत गैरसमज
कुटुंबनियोजन शस्रक्रिया केल्यास कमजोरी येईल त्यामुळे काम करता येणार नाही, नपुंसकत्व येईल,  ही शस्रक्रिया करण्याची जबाबदारी महिलांचीच आहे. अशा विविध भीती आणि गैरसमजांमुळे पुरुष शस्रक्रिया करणे टाळत असून, शस्रक्रिया करण्यासाठी महिलांना भाग पाडले जाते.

कुटुंबनियोजनाबाबत आजही विविध गैरसमज आहेत. त्यामुळे या शस्रक्रियेसाठी महिलांकडे पाहिजे जाते. आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात येणारी जनजागृती व्यापक व्हायला हवी. 
- सचिन गोळे, नागरिक

कुटुंबनियोजन शस्रक्रिया केल्यावर कमजोरी येते तसेच पुरुषत्व संपते यासारखे अनेक गैरसमज नागरिकांमध्ये आहेत. पुरुषांना याबाबत योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन व्हायला हवे. यासाठी जनजागृतीची मोहीम तीव्र होणे गरजेचे आहे.
- किशोर पवार, नागरिक

कुटुंबनियोजन शस्रक्रिया करण्याबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. कुटुंबातील कमावती व्यक्ती पुरुष असल्याने त्यांची शस्रक्रिया केल्यास त्यांना त्रास होऊ शकतो, अशी काही महिलांचीच मानसिकता असल्याने या शस्रक्रियेसाठी महिलाच पुढाकार घेतात. कुटुंब नियोजनासाठी महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जाते गैरसमज दूर करून पुरुषांनीदेखील यासाठी पुढे आलं पाहिजे.
- डॉ. धनवंती घाडगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, न. मुं. म.पा.

Web Title: Men's fear of family planning; Only 33 surgeries in four years, only 8,476 for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.