नवी मुंबई : कोरोनाकाळात महाराष्ट्रात वाढलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि रुग्णांना दिलेले उपचार हे वाखाणण्याजोगे असल्याचे मत डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. नवी मुंबई भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव, माजी नागसेविका कविता जाधव आणि साईराज व्याख्यानमाला यांच्या सहकार्याने शनिवारी १९ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या व्यख्यानमालेत डॉ. लहाने यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या वेळी डॉ. लहाने यांनी कोरोना आजार व काळजी तसेच डोळ्यांची काळजी यावर मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील दाट लोकवस्तीच्या परिसरांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक वाढत होता त्या वेळी राज्य शासनाने केलेल्या अंमलबजावणीमुळे दुष्परिणाम होणे कमी झाले. रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून राज्यात तीन तपासणी लॅब होत्या त्यांची संख्या वाढविण्यात आली असून सद्य:स्थितीमध्ये ४०९ लॅब आहेत तसेच रुग्णांना उपचारासाठी आधी २३ हजार खाटा होत्या आता तीन लाख ६० हजार खाटा असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. कोरोनाचा प्रसार नाकात आणि तोंडात झाला तर त्याचा शरीरावर जास्त परिणाम होत नाही, परंतु फुप्फुसात गेला तर श्वास घेण्यास अडथळे निर्माण होऊन मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे लहाने यांनी सांगितले. मधुमेह, रक्तदाब यासारखे विविध आजार असलेल्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असल्याने असे आजार असलेल्या व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी अद्याप संकट टळलेले नाही. त्यामुळे मास्क वापरणे, स्वच्छता आवश्यक असून सोशल डिस्टन्सचे पालन आवश्यक आहे. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डोळ्यांची काळजी आवश्यकमोबाइल आणि काॅम्प्युटर यासारख्या साधनांचा वापर जास्त प्रमाणात होत असून डोळ्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कॉम्प्युटरवर काम करताना सतत बसून राहणे योग्य नाही. मोबाइलवर गेम खेळणे डोळ्यांसाठी हानिकारक आहे. संध्याकाळी डोळ्यांना थंड पाण्याने धुणे आवश्यक आहे. यामुळे डोळा आणि डोके दुखत नाही. गरज नसताना डोळ्यांमध्ये कोणतीही औषधे टाकू नका, असा सल्ला लहाने यांनी यावेळी दिला.