शहरात रेल्वे स्टेशन परिसरांचे विद्रूपीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:51 AM2018-05-23T02:51:56+5:302018-05-23T02:51:56+5:30

सिडकोचे दुर्लक्ष : वाशी, जुईनगरसह नेरूळमधील शिल्पगुंजनसह म्युझिक फाउंटन बंद; नागरिकांची नाराजी

Liquidation of railway station premises in cities | शहरात रेल्वे स्टेशन परिसरांचे विद्रूपीकरण

शहरात रेल्वे स्टेशन परिसरांचे विद्रूपीकरण

googlenewsNext

नवी मुंबई : रेल्वे स्टेशन परिसराच्या सुशोभीकरणासाठी सिडकोने अनेक ठिकाणी शिल्प व कारंजे तयार केले आहेत, परंतु देखभाल न केल्यामुळे सर्व ठिकाणचे कारंजे बंद पडले आहेत. सुशोभीकरण प्रकल्पांची कचराकुंडी झाली असून, प्रवाशांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
देशातील सर्वात भव्य रेल्वे प्रकल्प नवी मुंबईमध्ये उभारण्यात आले आहेत. सिडकोने सर्वात प्रथम वाशी रेल्वे स्टेशनची उभारणी केली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क या इमारतीमध्ये सुरू केले आहेत. याशिवाय परिसरातील भूखंडही आयटी पार्कसाठी राखीव ठेवले आहेत. रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील जागेत आकर्षक म्युझिक फाउंटन तयार केले होते. येथील म्युझिक फाउंटन व कारंजे पाहण्यासाठी प्रवासी गर्दी करायचे. पण सिडकोने दहा वर्षांपूर्वीच हा प्रकल्प बंद करून टाकला आहे. सद्यस्थितीमध्ये म्युझिक फाउंटन परिसराची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यापूर्वी सहव्यवस्थापकीय संचालक पदावर दीपक कपूर असताना त्यांनी सुशोभीकरणाचे सर्व प्रकल्प पूर्ववत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु त्यांची बदली झाल्यामुळे ती योजना प्रत्यक्ष कार्यान्वित होऊ शकली नाही. वाशी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मॉल, विविध राज्यांचे भवन व आयटी पार्क असल्यामुळे हजारो नागरिक येथून ये - जा करत असतात. याठिकाणी बंद असलेले म्युझिक फाउंटन पाहून सर्वांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
जुईनगर रेल्वे स्टेशनसमोरच्या परिसराचेही सुशोभीकरण केले होते. सद्यस्थितीमध्ये तेथे भिकारी व भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त असतो. या रेल्वे स्टेशनला समस्यांचा विळखा पडला आहे. सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून सिडको प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. नेरूळ रेल्वे स्टेशनची स्थितीही बिकट झाली आहे. रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूला म्युझिक फाउंटन सुरू केले आहे. शिल्पगुंजन नाव दिलेल्या या कारंजाचे उद्घाटन जानेवारी १९९३ रोजी तत्कालीन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आर. सी. सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले होते. शिल्पगुंजनची देखभाल करण्याकडेही सिडको प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून सद्यस्थितीमध्ये त्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. येथील काही अंतरावर एक शिल्पही उभारले असून त्याचीही देखभाल केली जात नाही. विमानतळ, मेट्रो रेल्वेसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभारणाऱ्या सिडकोने यापूर्वी उभारलेल्या प्रकल्पांची देखभाल करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याविषयी प्रशासनाची भूमिका समजून घेण्यासाठी जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

व्यवस्थापकीय संचालकांच्या भूमिकेकडे लक्ष
यापूर्वीचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया व भूषण गगराणी यांनी पूर्ण लक्ष विमानतळ प्रकल्प सुरू करण्यावर दिले होते. सिडको कार्यक्षेत्रामधील यापूर्वी पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या देखभालीकडे पूर्ण लक्ष दिले नाही. रेल्वे स्टेशन परिसराच्या सुशोभीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. नवीन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र याविषयी काय भूमिका घेणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

खासगी कंपन्यांचा घ्यावा सहभाग
सिडको प्रशासनाला रेल्वे स्टेशन परिसराच्या सुशोभीकरणाचा खर्च परवडत नसेल तर बँका, बांधकाम व्यावसायिक व इतर उद्योजकांना म्युझिक फाउंटन व शिल्पगुंजनच्या सुशोभीकरणाची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यांच्या माध्यमातून देखभाल करण्यास सुरवात केली तर बंद पडलेले हे प्रकल्प पूर्ववत सुरू होऊन रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभीकरण करणे शक्य असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

शहराच्या स्वच्छ प्रतिमेला तडा
नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता अभियानामध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक आला आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक आहे. परंतु रेल्वे स्टेशनसमोरील म्युझिक फाउंटन, शिल्पगुंजनची दुरवस्था पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. या प्रकल्पांचे खंडरात रूपांतर झाल्याने शहराच्या स्वच्छ प्रतिमेला तडा जाऊ लागला आहे.

Web Title: Liquidation of railway station premises in cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.